"लॉकडाऊन'मध्ये ...सहा लाख जनतेची तहान भागवताहेत 341 कर्मचारी 

भूषण श्रीखंडे
शनिवार, 11 एप्रिल 2020

"लॉकडाउन'च्या काळात महापालिकेतर्फे अत्यावश्‍यक सेवेत असलेले पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी चोखपणे आपले कर्तव्य बजावून नियोजित वेळेत पाणीपुरवठा करीत आहेत. 

जळगाव :  राज्यासह देशभरात "कोरोना'चे संकट गडद होत आहे. "लॉकडाउन'मुळे अत्यावश्‍यक सेवांव्यतिरिक्त सर्वच यंत्रणा ठप्प आहे. मात्र, अशा विपरीत परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील 341 कर्मचारी व अधिकारी कुठलाही खंड न पाडता पाणीपुरवठा करून जळगावकरांची तहान भागवत आहेत. 

शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. तर कुसुंबा येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. सुमारे सहा ते सात लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहराला सध्याच्या "लॉकडाउन'च्या काळात महापालिकेतर्फे अत्यावश्‍यक सेवेत असलेले पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी चोखपणे आपले कर्तव्य बजावून नियोजित वेळेत पाणीपुरवठा करीत आहेत. 

तीन शिफ्टमध्ये काम 
पाणीपुरवठा विभागातील तीन उपविभागांपैकी "मशिनरी'चे अत्यंत महत्त्वाचे काम तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. वाघूर धरणावरील पाणी उपसा यंत्रणा, जलशुद्धीकरण केंद्रावरील मशिनरी तसेच गिरणा टाकी, रेमंड टाकी, डीएसपी चौक पाणी टाकी येथील पाणी उपसा यंत्रणा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी हे कर्मचारी काम करत आहे. 

दुरुस्तीसाठी विशेष पथक 
पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीसाठी विशेष पथक तयार केले आहे. यात कुठे जलवाहिनी खराब झाल्यास ती तत्काळ दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. "लॉकडाउन'च्या काळात तीन ते चार ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली. मात्र, पथकाने युद्धपातळीवर दुरुस्ती करून गळती थांबविली. 

अविरत सेवा 
पाणीपुरवठा विभागात "सिव्हिल', "इलेक्‍ट्रीक', "जलशुद्धीकरण' असे तीन उपविभाग असून "सिव्हिल' विभागात पाणी शहरात पाणीपुरवठा करण्याचे काम असून, इलेक्‍ट्रीक विभागातील कर्मचारी पंपिंग स्टेशन, पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करणे तर जलशुद्धीकरण विभागाकडे शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. 

सुरळीत, सुरक्षित पाणीपुरवठा 
शहरात मेहरुण, सालारनगर भागात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळले. त्या परिसरात कोणीही जाण्यास घाबरत असताना पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी जाऊन त्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरक्षित काळजी घेत करीत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Water Supply Division 341 employees are thirsting for six lakh people