video मुस्लिम आणि स्त्रियांना असुरक्षित वाटणे लज्जास्पद  : साहित्यिक भालचंद्र नेमाडे 

bhalchandra nemade
bhalchandra nemade

जळगाव : सध्याच्या काळात मुस्लिम आणि स्त्रियांना असुरक्षित वाटणे ही लज्जास्पद बाब असल्याचे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कला-साहित्य क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. 


प्रख्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जीवनगौरव तर मेघना पेठे, रफिक सूरज आणि अजय कांडर यांनाही या सोहळ्यात पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्येष्ठ समाजसेवी दलुभाऊ जैन यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. 
डॉ. नेमाडे म्हणाले, महाराष्ट्र हा तर मुस्लिमांनी बनविलेला आहे. उत्तरेतील मुघल सैन्याविरुद्ध मराठी बाणा एकत्र करणारे शहाजी वगैरे सगळ्यांना एकत्रित करणारे मलिक अंबर होते. शिवाजीच्या घोडदळात 80 टक्के मुस्लिम घोडेस्वार होते. शिवाजींचे अंगरक्षक मुसलमान होते. सर्वाधिक विश्वासू मुसलमान होते, असे असताना मुस्लिमांना असुरक्षित वाटणे हे आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे. 
दुसरा लज्जास्पद प्रकार म्हणजे मुलींना स्त्रियांना हल्ली फार वाईट दिवस आलेले आहेत. एवढे आपल्याकडे समाजशास्त्रज्ञ आहेत, कायदेतज्ज्ञ आहेत, पण कोणालाही याप्रश्नी काही उपाय सापडत नाही. बलात्कार, महिलांना पेटवून देण्याच्या घटना वर्तमानपत्रांमध्ये रोज वाचायला मिळतात, पुरुष म्हणून लाज वाटावी, अशी ही परिस्थिती आहे. आपण लहानपणापासून नातेवाईकांच्या निमित्ताने महिलांमध्ये वावरत असतो. पण आज महिलांची संख्याच कमी होताना दिसतेय. विशेषतः सुशिक्षित लोकांमध्ये बायका कमी झाल्या. मलबार हिलचे उदाहरण पाहा. मुंबईत महिलांचे सर्वांत कमी प्रमाण पैशाने पुढारलेल्या मलबार हिलमध्ये दिसून येते. उलटपक्षी आदिवासींमध्ये मुली-मुलांचे प्रमाण सारखे आहे. हिमाचलमध्ये वैगरे तर मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुलींची संख्या सगळ्याच क्षेत्रात वाढली पाहिजे. पोलिसांत, आर्मीतही महिला पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. 

तर मारुन टाकलं तरी चालतं... 
काही समस्या निर्माण झाली तर तिथल्या तिथे सोल्यूशन काढायचं. तुमच्या शीलावर अतिक्रमण होत असलं तर मारुन टाकलं तरी चालतं, असं मला आमच्या कायदेतज्ज्ञांनी सांगितलंय. वेळ पडली तर मुलींनी त्या माणसाला मारुन टाकलं तरी चालतं. मला प्रश्न असा पडलाय की मुली मारुन का टाकत नाहीत... असा आपण हिंसक दृष्टीने विचार करायला लागणं हे ही किती वाईट आहे पाहा.. आपले विचार असे हिंसक होत चालले आहेत, या शब्दांत नेमाडे यांनी या स्थितीचे वर्णन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com