Loksabha 2019 : मुस्लिम, मराठा मते ठरणार निर्णायक 

दिलीप वैद्य
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

रावेर ः आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या रावेर मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना युतीच्या खासदार रक्षा खडसे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. विधानसभेचा रावेर मतदारसंघ हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी सुमारे तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, त्यानंतर चार वेळा या विधानसभा मतदारसंघातून भाजप विजयी झाला आहे. 

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना तालुक्‍यातून सुमारे 47 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. गेल्या पाच वर्षांत श्रीमती खडसे यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे. रस्ते, उड्डाणपूल, रावेर रेल्वेस्थानकात मिळालेला "महानगरी'चा थांबा आणि ठिकठिकाणी त्यांनी बसवून दिलेले "हायमास्ट लॅम्प' या त्यांच्या कामाच्या जमेच्या बाजू आहेत. माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांचाही या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. असंख्य कार्यकर्ते आणि व्यक्ती यांच्याशी त्यांचा जवळून संपर्क आहे. आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, पद्माकर महाजन यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची फळी त्यांच्याकडे आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे तालुक्‍यातील विवरा येथील रहिवासी आहेत. अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा तालुक्‍यात, मतदारसंघात नियमित संपर्क आहे. निमंत्रण मिळाल्यानंतर कार्यक्रम न चुकविणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय कॉंग्रेसचे उमेदवार असल्याने अल्पसंख्याक व दलित समाजाची मते त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात. माजी आमदार शिरीष चौधरी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद महाजन, पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह माजी आमदार रमेश चौधरी, बाजार समितीचे सभापती राजीव पाटील या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे मोठे जाळे या मतदारसंघात आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अरुण पाटलांसह मराठा नेटवर्क त्यांच्या कामे येणार आहे. त्याचाही फायदा डॉ. उल्हास पाटील यांना होऊ शकतो. 
दोन्ही मतदार दिग्गज आहेत. डॉ. पाटील यांना निवडणुकांचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे मतदार संपर्क अभियान प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत, तर रक्षा खडसे यांचा गेल्या पाच वर्षात चांगला संपर्क राहिला आहे. गतवेळी मोदी लाट होती, पण यावेळी या लाटेशिवाय त्या रिंगणात उतरल्या आहेत. या सर्व स्थितीचा काय परिणाम या निवडणुकीवर होतो आणि तालुक्‍यातून कोण मताधिक्‍य मिळवतो, हे त्यांच्या आगामी प्रचारावरच निश्‍चित होणार आहे. 
.... 
लोकसभा 2014 मते 
- रक्षा खडसे (भाजप) ः 1,01700 
- मनीष जैन (राष्ट्रवादी) ः 54760 
- डॉ. उल्हास पाटील (अपक्ष) ः 7,460 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muslime maratha vote