ग्रामीण भागातील शाळांमध्येही मराठीला ‘गुडबाय’

धनश्री बागूल
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

इंग्रजी शाळांसाठी ‘हट्ट’
मराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस होणारी ही घसरण चिंताजनक असून शासनाचा यावर कुठलाही प्रतिबंध आणि उपाययोजना नसल्याने पालकांनी आपल्या पाल्याचा इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी हट्ट वाढविला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांची संख्या भरमसाट वाढ झाली. याचा परिणाम अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील पटनोंदणीचा आकडा फुगविण्यावरसुद्धा झाला. यामुळे शाळांमधील गैरव्यवहाराचे प्रमाणही वाढले आहे.

जळगाव - शाळांना ‘डिजिटल’ करण्याचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची दरवर्षी घटणारी संख्या चिंताजनक असल्याचे मानले जात आहे. प्राथमिक शाळांमध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याने विद्यार्थी संख्या टिकवून ठेवणे हे मराठी शाळांमधील शिक्षकांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

दरम्यान, इंग्रजी शाळांमध्ये पाल्यांना टाकण्याची ‘क्रेझ’ व सीबीएसई, आयसीएसई पॅटर्नच्या नवलाई, आकर्षणामुळे इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढतो आहे. यामुळे गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाला ‘गुडबाय’ केला आहे. 

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत असतो परंतु जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांची ही स्थिती पाहता पुढील काळात शाळांमधून मराठी भाषा हद्दपार होते की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ८४८ शाळा आहे. त्यापैकी विद्यार्थी नसल्याने तीन शाळा या वर्षापासून बंद करण्यात आल्या आहे. दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढा वाढत चालला आहे, परिणामी जिल्हा परिषद, महापालिका, खासगी मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या ही झपाट्याने घटत आहे.

‘मनपा’च्या शाळेत विद्यार्थी दिसेना
सुरवातीला शहरात महापालिकेच्या ३१ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढल्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत गेली. त्यामुळे कमी पटसंख्या झाल्याने तब्बल सहा शाळा बंद करण्यात आल्या. सध्या महापालिकेच्या शहरात फक्त २५ शाळाच सुरू असून त्यातही विद्यार्थी संख्या ही अत्यंत अल्प आहे.

चांगल्या नोकऱ्यांसाठी धडपड
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण हे खासगी शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. विशेषतः अमराठी पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवीत आहेत. इंग्रजी भाषा शिकलेल्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत असल्याने हे प्रमाण वाढत आहे. ज्या ठिकाणी सरकारी नोकऱ्या मिळविण्याची धडपड आहे, असेच पालक मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवितात.

चांगले शिक्षक मराठी शाळेत 
मराठी माध्यमांच्या शाळांना सरकारी अनुदान मिळते. तेथील शिक्षकांना वेतन व निवृत्तिवेतन मिळत असल्याने अनेक चांगले शिक्षक मराठी माध्यमांकडे वळतात. त्या तुलनेत इंग्रजी शाळांमध्ये चांगले शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शिकवणी वर्गांना प्रवेश घ्यावा लागतो, असेही बोलले जाते. 

Web Title: marathi news jalgaon news school marathi goodby