सार्वे धरणातून पाणी सोडण्यावरुन तणाव 

प्रमोद पवार 
शुक्रवार, 2 मार्च 2018

कजगाव (ता. भडगाव) -  सार्वे बुद्रूक (ता. पाचोरा) येथील धरणातून पाणी सोडण्यास परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आज सायंकाळी अभियंता आर. एस. मोरे हे पोलीसांचा ताफा घेऊन आले असता, सार्वे व भामरे गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

दरम्यान, पाणी सोडण्याबाबत अखेरपर्यंत तोडगा न निघल्याने पथकाला माघारी फिरावे लागले. शेतकऱ्यांचा विरोध व मागणी पाहता, हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. 

याबाबत माहिती अशी, सार्वे बुद्रूक (ता. पाचोरा) येथील धरणातील पाणी साठ्यातून खाजोळा व भोरटेक या गावांनी टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्यास हरकत नाही, असा अहवाल दिल्यानंतर सार्वे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, लघु मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता आर. एस. मोरे हे आज सायंकाळी सहाला पाणी सोडण्यासाठी धरणावर आले. मात्र, धरणातून पाणी सोडले जाऊ नये, यासाठी सार्वे व भामरे गावातील शेतकरी दुपारपासून धरणावर तळ ठोकून होते. 

दरम्यान, यावर्षी कमी पर्जन्यमान झाले असून आमच्या धरणात पाणी कमी आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो. भोरटेक व टाकळी गावांवर आज कोणतेही जलसंकट नाही. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली या पाण्याचा शेतीला उपयोग व्हावा यासाठी पाणी मागणी केली जात आहे. त्यामुळे पाणी सोडण्याला विरोध होत आहे. 

अभियंत्यांना घेराव 
दरम्यान, शेतकऱ्यांनी विरोध करून अभियंत्यांना घेराव घालून त्यांना चांगलेच धारेवर धरले. सार्वेचे सरपंच शरद पाटील व भामरेचे सरपंच पाणी सोडण्यास महिन्यापूर्वी लेखी निवेदन देऊन विरोध केला होता. तरी देखील हेतुपुरस्सर पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पाटील यांनी केला. यावेळी भाऊसाहेब पाटील, नामदेव पाटील, विलास पाटील, सुभाष पाटील, कमलेश पाटील, आबा चौधरी, राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी धरण परिसरात तणाव निर्माण झाल्याने व शेतकऱ्यांचा विरोध पाहता, अधिकारी माघारी फिरले. यावेळी पाचोरा येथील पोलीसांचा बंदोबस्तही मागविण्यात आला होता. 

Web Title: marathi news jalgaon news uttar maharashtra water sarve dam