तपासाधिकारी बदलणं... वाटतं तेवढं सोपं नाहीच! 

सचिन जोशी
सोमवार, 2 जुलै 2018

गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती निर्माण झालीय. गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलण्यावरून घडलेलं हे प्रकरण वर-वर वाटतं तेवढं सोपं निश्‍चितच नाही... 

गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती निर्माण झालीय. गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलण्यावरून घडलेलं हे प्रकरण वर-वर वाटतं तेवढं सोपं निश्‍चितच नाही... 

राजकीयदृष्ट्या जळगाव जिल्हा कधी नव्हे, एवढा संवेदनशील बनला आहे. याआधीही तो होताच. मात्र, गेल्या काही वर्षांत तो कमालीचा संवेदनशील बनलाय, तो वेगवेगळ्या घटना- घडामोडींनी. जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही गंभीर घटना, गुन्हे घडत असताना त्यात थेट राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ही संवेदनशीलता अधिकच वाढली आहे. अशा घटनांमध्ये मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दिलेली तक्रार, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दाखल गुन्ह्याचे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. 
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कडलग यांनी तपासाची सूत्रे हाती घेत थेट दमानियांच्या दरवाजापर्यंत धडक दिली. पोलिस यंत्रणेला पुरून उरणाऱ्या दमानियांनी त्यांना काही जुमानले नाही. उलट, ज्या अधिकाऱ्याबद्दल आधीच तक्रार केली आहे, तो या गुन्ह्याचा तपास कसा करतोय, असा प्रश्‍न घेऊन दमानियांनीच पोलिस अधीक्षकांकडे तपासाधिकारी बदलण्याची मागणी केली, तसा ई-मेल पाठविल्याचेही त्या म्हणाल्या. 
केवळ दमानियांच्या ई-मेलवर पोलिस अधीक्षक खडसेंनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलतील, याची शक्‍यता नाही. आता मंत्रिपदावर नसले, तरी खडसेंचा एकूणच प्रशासनावरील प्रभाव कराळे साहेबांना माहीत नसणेही शक्‍य नाही. दोन-चार दिवसांतच पुन्हा या घटनेचा तपास कडलगांकडे जातो, यावरून खडसेंचा प्रभाव असल्यावर असेही शिक्कामोर्तब झालेच. तरीही या गुन्ह्यातील तपासाधिकारी बदलला, हे नवलच म्हणावे लागेल. अर्थात, पोलिस अधीक्षकांना त्यासाठी सरकारच्या "वरिष्ठ' पातळीवरून आदेश झाले असतील, हे वेगळे सांगायला नको. त्यातच हा विषय गृह खात्याशी संबंधित आहे आणि हे खाते दस्तरखुद्द मुख्यमंत्री महोदयांकडे असताना, असे होणे किंवा न होणे अशा दोन्ही प्रकारांबाबत संशय घेण्यास वाव आहे. 
खडसे- दमानियांमधील वाद सर्व महाराष्ट्राला माहीत झालाय, तो असाच आणखी बरेच दिवस सुरू राहील. मात्र, दोघांचे एकमेकांवरील आरोप किमान "लॉजिकल कॉन्क्‍ल्युजन'ला पोचावे, अशी अपेक्षा गैर नाही. दमानियांवर दाखल गुन्ह्यातील तपास योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे झाल्यास त्यातून बरीच तथ्ये बाहेर येतील. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, एवढेच...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon nimitt