‘शिवसेनेचा वाघ आता म्यॉव म्यॉव करतो’ : देवेंद्र फडणवीस

सम्राट महाजन
Saturday, 4 January 2020

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही म्हणण्यात येते, तरीही शिवसेना सत्तेसाठी शांत, चूप बसते. शिवसेनेचा वाघ आता डरकाळी फोडत नाही, तर म्याव म्याव करीत दिल्लीतील मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहतो, असे सांगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाचा विकास करण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपला निवडून द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

बोरद : वर्गात पहिल्या आलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चाळीस मार्क्स मिळविलेले तीन पक्ष एकत्र आले. आताचे महाराष्ट्र शासन ‘मेरिट’ने नाही तर लबाडी व जनादेशाचा अवमान करीत सत्तेवर आले आहे, अशी खरमरीत टीका करीत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्ला चढविला. 

हेही पहा > आम्ही सोबतच : खडसे, महाजन यांचे स्पष्टीकरण

बोरद येथे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवारांचा प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, देवमोगरा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रा. विलास डामरे, शहराध्यक्ष योगेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, आनंद सोनार, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी, किसान आघाडीचे प्रवीणसिंग राजपूत, महेंद्र पटेल, रतिलाल पाटील, कैलास चौधरी, बळिराम पाडवी आदी उपस्थित होते. 
 फडणवीस म्हणाले, की कर्जमाफी देताना महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करू व सरसकट कर्जमाफी देऊ, असे नेते सांगत होते. मात्र, आता कर्जमाफी जाहीर करताना अनेक अटी टाकल्या आहेत. सर्वांत जास्त मोठी फसवणूक अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची झाली आहे. केंद्रातील मोदी शासनाने सातत्याने गरिबांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला असून, बेघरांना घरे, जवळपास ४५० वाड्या-पाड्यांमध्ये वीज, आदिवासी बांधवांना वनजमीन- वनपट्टे देण्यात आले. अठरा हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, पुढील दहा वर्षांसाठी आरक्षणाला मुदतवाढ दिली आहे. 

आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थितांना भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचार केला असून, सर्वसामान्य नागरिकांचे कुठलेच काम केले नाही, असे सांगितले. यशवंत पाडवी, राजेंद्र गावित यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ. शशिकांत वाणी, अविनाश मराठे यांनी सूत्रसंचालन केले. गट- गणांतील सर्व उमेदवार उपस्थित होते. सभेला सुमारे तीन हजार नागरिकांची उपस्थिती होती. 

इथे का एकत्र आले नाहीत? 
जिल्हाध्यक्ष चौधरी म्हणाले, की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला शत-प्रतिशत यश मिळेल. जे पक्ष राज्यात सत्तेसाठी एकत्र आले आहेत, ते इथे मात्र एकत्र येऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. 

डॉ. हीना गावित यांची टोलेबाजी 
खासदार डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, की भाजप शासनाच्या मागील पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख १० हजार घरकुले मंजूर केली. मात्र, काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यात आडकाठी आणतात. त्यामुळेच नागरिकांना वेळेवर घरकुलांचे हप्ते मिळत नाहीत. काँग्रेसमुळेच अनेक चांगली कामे होऊ शकली नाहीत. 
 
‘शिवभोजन थाळी’वर टीकास्त्र 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी शासनाच्या ‘शिवभोजन थाळी’वर जोरदार टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात १८ हजार, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी फक्त ३०० नागरिकांना या योजनेंतर्गत थाळी उपलब्ध होणार असून, तीही फक्त दुपारी बारा ते दोन या वेळेतच. त्यामुळे ही योजना निव्वळ धूळफेक असून, या शासनाला गोरगरिबांची काळजी नाही, असे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar devendra fadnavis shivsena target