"लॉकडाउन'मुळे कूलर दुरुस्ती होईना!; उकाडा असह्य​

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

उन्हाची तीव्रता गेल्या आठवड्यापासून वाढण्यास सुरवात झाली आहे. जळगावचा पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहचल्याने दुपारी बारापासून घरात थांबणे कठीण होत आहे. फॅन लावून देखील उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. तर कुलरच्या जाळ्या भरणे किंवा बंद पडलेले कुलर दुरुस्त करण्यास कारागीर मिळत नसल्याने नागरिकांची घालमेल होत आहे

जळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागली, की घराच्या कोपऱ्यात पडलेले कुलर बाहेर काढून त्याच्या दुरुस्तीसाठी लगबग सुरू होते. यंदा मात्र "लॉकडाउन'मुळे कुलर दुरुस्ती करता येत नसल्याची स्थिती यंदा निर्माण झाली आहे. यामुळे संपूर्ण कुलरचा हंगामच थांबला आहे. 
"कोरोना व्हायरस'मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. यात दोन महिन्यांचा सिझनेबल व्यवसाय असलेला कुलरचा हंगाम देखील ठप्प पडला आहे. अनेक इलेक्‍ट्रिकल्स दुकानचालकांनी मार्चच्या सुरवातीलाच लागणारा माल भरून ठेवला होता. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाल्याने सारेच थांबले असल्याने दुरुस्ती करणे देखील शक्‍य होत नाही. यामुळे उष्णता वाढली असताना देखील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुकानचालक देखील लॉकडाउन उठण्याची वाट पाहत आहेत. 
 
कोट्यवधीची उलाढाल 
"कोरोना व्हायरस'मुळे उन्हाळ्याचा पार्श्वभूमीवर लाखोची रक्कम गुंतवून करून मागविलेले कुलर गोदामात थप्पी लागून पडले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोडोची उलाढाल ठप्प झाली आहे. केवळ जळगाव शहराचा विचार केल्यास अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल कुलरच्या माध्यमातून होत असते. परंतु लॉकडाउनमुळे सारेच लॉक झाल्याने यंदाचा सीझन निम्मे होणे देखील कठीण जाणार आहे. एकंदरीत कुलर दुरुस्ती करणारे कारागिरही आर्थिक संकटात सापडले आहेत. 

नागरिकांचीही घालमेल 
उन्हाची तीव्रता गेल्या आठवड्यापासून वाढण्यास सुरवात झाली आहे. जळगावचा पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहचल्याने दुपारी बारापासून घरात थांबणे कठीण होत आहे. फॅन लावून देखील उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. तर कुलरच्या जाळ्या भरणे किंवा बंद पडलेले कुलर दुरुस्त करण्यास कारागीर मिळत नसल्याने नागरिकांची घालमेल होत आहे. काही जणांनी घरच्या घरी किरकोळ दुरुस्ती करून सुरू करण्याचे काम केले. तर काहींनी आहे त्या स्थितीत कुलर सुरू करून घरात गारवा मिळवत आहेत. तरी देखील दुरुस्तीसाठी कोणी मिळते का? याचा शोध घेतला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon No cooler repairs due to "lockdown"