रेशनकार्ड नसलेल्यांनाही 5 किलो तांदूळ मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्याचे आदेश आहेत. 

जळगाव : जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्या लोकांना शासनाकडून 5 किलो मोफत तांदूळ दिले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे रेशनकार्ड नसलेल्यांची यादी तयार करणे सुरू आहे. यादी तयार करण्यासाठी व तांदूळ वाटपासाठी संबंधित भागातील दक्षता समिती सदस्य, नगरसेवक, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंचांची मदत घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली. 
"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या "लॉकडाउन'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्याचे आदेश आहेत. 

कोणाला मिळू शकते ही मदत 
ज्या नागरिकांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत रेशनकार्डासाठी अर्ज केला आहे. परंतु अद्याप त्यांना रेशनकार्ड मिळालेले नाही. अन्नधान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर व रोजंदारीवरील मजूर आहेत, त्यांना या योजनेचा लाभ होईल. 

आधारकार्ड, ओळखपत्र घेणार 
या विनारेशनकार्डधारकांना धान्य मोफत वितरण होईल. मात्र, त्यांच्याकडून आधारकार्ड नंबर जो प्रमाणित असेल किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून त्याची स्वतंत्र नोंद केले जाईल. प्रत्येक वितरण केंद्रावर तांदूळ वितरणासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. यासाठी त्या-त्या क्षेत्रातील दक्षता समिती सदस्य, नगरसेवक, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने तांदूळ संबंधित रेशन दुकानात पोहोचविण्याचे काम सुरू आहे. 

रेशनकार्ड नसलेल्या लोकांना 5 किलो तांदूळ मोफत वाटप होईल. मेअखेरपर्यंत हे काम सुरू होईल. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराने वितरण केंद्रावर गर्दी टाळावी, "सोशल डिस्टन्सिंग' पाळून ते वाटप करावे. 
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon non reshan card family five kg rice