उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व गिरीश महाजनांकडे 

कैलास शिंदे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याची पक्षाची तयारी आहे. गेल्या वेळी माजी मंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी होती. त्यांनी ती यशस्वीपणे निभावून तब्बल 19 जागा भाजपला मिळवून दिल्या होत्या.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याची पक्षाची तयारी आहे. गेल्या वेळी माजी मंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी होती. त्यांनी ती यशस्वीपणे निभावून तब्बल 19 जागा भाजपला मिळवून दिल्या होत्या. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या नेत्याकडे पुन्हा जबाबदारी येत असल्याने भाजपला ते किती जागा मिळवून देणार, याकडेच आता लक्ष असणार आहे. 

विधानसभेच्या उत्तर महाराष्ट्रात 47 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेना गेल्या वेळी वेगवेगळे लढल्याने भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविल्या. त्यावेळी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपत प्रवेश दिला होता. शिवसेना- भाजप युती तोडण्याचा निर्णय पक्षामार्फत त्यांनीच जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपला जास्तीत जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून तब्बल 19 जागा भाजपला मिळवून दिल्या होत्या. त्यामुळे युतीत भाजपला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होता आले. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीबाबत अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही. युती झाली तर गेल्यावेळी मिळालेल्या जागेच्या बळावर तेवढ्या जागा भाजपला लढण्यासाठी मिळतीलच, आणि युती नाही तर मात्र भाजप स्वतंत्रपणे सर्व 47 जागा लढविण्यास सज्ज असेल. मात्र, उत्तर महाराष्ट्रात यावेळी भाजप नेतृत्वाची भाकरी फिरविण्यात आली असून, जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर असेल. मंत्री महाजन यांनी गेल्या पाच वर्षांत पक्ष आणि सरकारला अनेक अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळेच त्यांना "संकटमोचक'ही म्हटले जात आहे. सध्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी विश्‍वासातील मंत्री म्हणून ओळखले जात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही उत्तर महाराष्ट्रातून पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून देवून पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्‍वास त्यांना सार्थ ठरवावा लागणार आहे. 

मंत्री महाजन यांना उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणे फारसे कठीण जाणार नाही. कारण सद्यःस्थितीत ते नाशिक व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नाशिक जिल्ह्याची त्यांना आता चांगली राजकीय माहिती झालेली आहे; तर जळगाव हा त्यांचाच जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही काही काळ त्यांच्याकडे होते. धुळे महापालिकेच्या निवडणुकीपासून या जिल्ह्यातील राजकारणाचीही त्यांना चांगलीच ओळख आहे. नगर जिल्ह्यातही त्यांनी महापालिका निवडणूक व लोकसभा निवडणुकीत लक्ष दिले होते. उत्तर महाराष्ट्रात पक्षातर्फे उमेदवारी देण्याबाबत महाजन यांच्याकडेच अधिकार असतील, त्यामुळे त्यांच्या पसंतीनुसारच उमेदवारी दिली जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्यावेळी पराभूत झालेल्या काही मतदारसंघात विरोधी पक्षातील काही उमेदवारांना भाजपत प्रवेश देवून त्यांना उमेदवारी देण्याची चाणाक्ष खेळीही महाजन करण्याची शक्‍यता आहे. गेल्या वेळी खडसे यांनी पक्षाला मिळवून दिलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी पक्ष विरोधी गटात होता. यावेळी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे मंत्री महाजन उत्तर महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळवून देणार, त्यावरच त्यांच्या राज्यातील नेतृत्वाचाही कस लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon north maharashtra girish mahajan