"विरोधकांनो, कोरोना संकटानंतर मैदानात या; सरकार पाडून दाखवाच : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार पक्के बसलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचा सरकार पाडण्याचा हा प्रयत्न केविलवाणा आहे.

जळगाव : राज्यात "कोरोना'सारखी गंभीर परिस्थिती आहे, सरकार त्याच्याशी लढा देत आहेत. अशा स्थितीत सरकारला साथ देण्याऐवजी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे गलिच्छ राजकारण विरोधक करीत आहे. खरंच हिम्मत असले तर "कोरोना'च्या संकटानंतर मैदानात यावे आणि हे सरकार पाडून दाखवावे असा इशारा शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात एकीकडे "कोरोना'सारख्या परिस्थितीशी लढा दिला जात आहे, तर दुसरीकडे हे सरकार पडणार अशी चर्चा केली जात आहे. अशी चर्चा निर्माण करणे म्हणजे जे अधिकारी काम करीत आहेत. त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार विरोधक करीत आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, "कोरोना'चे संकट झाल्यानंतर मैदानात येऊ या, तुम्हाला वाटले तर सरकार पाडाच, परंतु त्या अगोदर आपण हाही विचार करा, "कोरोना'शी सरकार लढा देत असताना, अशा स्थितीत विरोधक म्हणून आपण किती काम करीत आहोत. नुसते राजकारण करू नका. मध्यप्रदेशात "कोरोना' लागू होण्यापूर्वी जी स्थिती करण्यात आली, तीच स्थिती महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. या विरोधकांनी कितीही डफलाडफली केली तर आज राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार पक्के बसलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचा सरकार पाडण्याचा हा प्रयत्न केविलवाणा आहे. 

सत्तेबाहेर असल्याने तडफड 
भारतीय जनता पक्षाची सत्तेबाहेर असल्याने तडफड सुरू असल्याचे मत व्यक्त करून गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात "कोरोना'ची संख्या वाढत असल्याचे सल्ले विरोधक भाजपवाले देत आहेत. मात्र त्यांनी हेच सल्ले गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. त्यांना नेहमी सत्तेत राहून सल्ले देण्याची सवय पडली आहे. आज ते सत्तेबाहेर आहे त्यामुळे एखादा पाण्यातील मासा पाण्याबाहेर आल्यानंतर जसा तडफडतो, तशीच सत्तेबाहेर असल्यामुळे या विरोधकांची तडफड सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Opponents, come to the field after the Corona crisis; overthrow the government and show it: Gulabrao Patil