अरे... दारूच्या धंद्यात चक्क  "पीआय'चे हात "ओले' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

घडल्या प्रकरणात पोलिस कर्मचारी असो, की अधिकारी कोणीही वाचणार नाहीच. प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटी गठित करण्यात आली असून, चौकशीतून नेमके सत्य समोर आणले जाईल. दोनच दिवसांत या प्रकरणात दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई होईलच. 
- भाग्यश्री नवटके, अप्पर पोलिस अधीक्षक 

 

जळगावः अंजिठा चौकातील आर. के. वाइन्सच्या गोदामातून लॉकडाउनच्या काळात होणाऱ्या तस्करीत एक पोलिस निरीक्षक व त्याचा साथीदार अशा दोघांची टक्केवारीत भागीदार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संबंधित निरीक्षकासह दुकान मालकाच्या संपर्कातील निकटवर्तीय पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून जाब-जबाब नोंदवण्यात आले आहेत. दोन दिवसांत या प्रकरणी मोठ्या कारवाईचे संकेत चौकशी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 12) एप्रिलला पहाटे अंजिठा चौकातील आर. के. वाइन्स शेजारील गोदामातून महागड्या दारूच्या तस्करीसाठी माल लोड करत असतानाच संबंधितांना रंगेहाथ अटक केली होती. मूळ दारू तस्करीचे प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोपविल्याने त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आर. के. वाइन्स या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला. 

संपर्कातील कर्मचारी रडारवर 
आर. के. वाइन मालकाच्या नजीकच्या संबंधातील आणि संपर्कातील मनोज सुरवाडे, भरत शांताराम पाटील, संजय जगन्नाथ जाधव, दीपक चौधरी, रवींद्र लालचंद चौधरी, विजय बळिराम नेरकर, जितेंद्र राजपूत, रवींद्र नरवाडे, जीवन काशिनाथ पाटील आदी नऊ कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आले आहेत. 

"सकाळ'चे अंगुली निर्देश 
आर. के. वाइन्स या मद्याच्या तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली, त्याच्या तीनच दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडलेली दारूने भरलेली कार एका निरीक्षकाच्या सांगण्यावरून चिरीमिरी घेत सोडून दिली होती. या प्रकरणी गुन्ह्याच्या बातमीसोबतच संबंधित दोषींवर यंत्रणेचे लक्ष जावे आणि त्याही प्रकरणाचा उलगडा व्हावा, यासाठी "सकाळ'ने पाठपुरावा चालवला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon PI's Partnership 'wet' in liquor business