कर्तव्य बजावताना त्यांनी झुगारले डायालिसिसचे उपचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

कोरोनाचे संकट भीषण असले तरी त्यास परतवून लावू असा विश्वास ते व्यक्त करतात. त्याचवेळी अधिकारी यांचे पाठबळ व जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत हीच आमची प्रेरणा असल्याचे ते सांगतात.

अमळनेर : मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पाॅट  बनत असताना या भिषण संकटाच्या  काळातही पोलिस दलातील अनेक अधिकारी,कर्मचारी आपले आजारपण ,आरोग्य, कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून आपले कर्तव्य बजावण्यात व्यस्त आहेत. मालेगाव शहरातील कॅम्प पोलिस ठाण्यातील जमादार व मुळचे  हातेड (ता.चोपडा जि जळगाव) येथील रहिवासी असलेले राजेंद्र लक्ष्मणराव सोनवणे अशाच कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व. गेल्या चार वर्षांपासून ते डायालिसिसवर आहेत.आठवड्यातून दोन वेळा तपासणीसाठी दवाखान्यात जावे लागत असताना ते सध्या कॅम्प परिसरात रावळगाव नाक्यावर  बंदोबस्तासाठी तैनात आहेत. कोरोनाचे संकट भीषण असले तरी त्यास परतवून लावू असा विश्वास ते व्यक्त करतात. त्याचवेळी अधिकारी यांचे पाठबळ व जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत हीच आमची प्रेरणा असल्याचे ते सांगतात.
गेल्या तेहतिस वर्षांपासून ते पोलिस दलात कार्यरत आहेत.त्यांना चार वर्षापूर्वी मुतखड्याचा त्रास जाणवला औषधोपचार घेताना एक किडणी खराब झाल्याने ती काढून टाकावी लागली.तर दुसरी किडणी केवळ पस्तीस टक्के कार्यरत आहे.गेल्या चार वर्षांपासून ते या आरोग्याच्या समस्येशी झुंज देत कर्तव्य बजावत आहेत.त्यांनी आजवर अनेक विपरीत परिस्थितीत काम केले आहे.

कोरोनाचे संकट गंभीर आहे या संकटाला हरवायचे असेल तर लोकांनी घरात थांबणे हाच एक पर्याय आहे.लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आम्हाला रस्त्यावर उभे राहावेच लागेल. लोकांना समजावून देखील जेव्हा विनाकारण रस्त्यावर येतात तेव्हा काळजी वाटते आणि कायद्याचा बडगा उगारावाच लागतो. सध्या कामाचा ताण असला तरी माझ्यासारखे अनेक स्वःताचे आरोग्य सांभाळून कर्तव्य बजावत असून. कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी हेदेखील या काळात धीर देत असून त्यामुळे मी येथे खंबीर उभा आहे.ह्या संकटाला आपण सर्व मिळून नक्की हरवू.

राजेंद्र सोनवणे, जमादार, मालेगाव कॅम्प


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police malegaon duty no dialisis