मामावं...माझ्या पप्पाने मम्मीला गोळी मारली..! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

पती-पत्नीत खटके उडून वादाला तोंड फुटले वाद विकोपाला जावुन संतापाच्या भरात उपनिरीक्षक धनराज शिरसाठ यांनी पत्नी संगीता हिच्यावर आपल्या सर्विस रिव्हॉल्वर मधुन गोळी झाडल्याची घटना घडली.

जळगाव : मुसळी(ता.धरणगाव) येथील मुळ रहिवासी उपनिरीक्षक धनराज बाबुलाल शिरसाठ(वय-34) नक्‍शल प्रभावीत गडचिरोलीत मुलचेरा येथे कार्यरत आहे. आज दुपारी पती-पत्नीत खटके उडून वादाला तोंड फुटले वाद विकोपाला जावुन संतापाच्या भरात उपनिरीक्षक धनराज शिरसाठ यांनी पत्नी संगीता हिच्यावर आपल्या सर्विस रिव्हॉल्वर मधुन गोळी झाडल्याची घटना घडली. घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या या दाम्पत्याच्या सात वर्षीय मुलगी भार्गवीने घटनेची माहिती जळगावी फोन करुन मामा गणेश सपके यांना कळवली. गोळीलागल्याने संगीता शिरसाठ(वय-28) यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच माहेरच्या मंडळीं गडचिरोली कडे रवाना झाली आहे. 

हेही पहा - नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​

शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी संगीता यांचा विवाह मसळी (ता.धरणगाव) येथील धनराज बाबुलाल शिरसाठ यांच्याशी झाला आहे, वर्ष-2006 मध्ये मुंबईच्या पोलिस भरतीत धनराज शिरसाठ यांची निवड झाली. तेथून जिल्हाबदली अंतर्गत जळगावी आल्यावर शहर पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते.तदनंतर वर्ष-2017 मध्ये खातेअंतर्गत परिक्षा उत्तीर्ण होवून ते उपनिरीक्षक झाले, पहिलीच पोस्टींग खडतर सेवेची नक्‍क्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात झाली असून ते पत्नी संगीता, मुलगी भार्गवी(वय-7), मुलगा शिवा (वय-4) अशा कुटूबासह तालूका मुलचेरा येथे पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. 

कौटूंबीक वादातुन खटके 
वर्षभरापासून धनराज व संगीता यांच्यात वाद सुरु आहे. याबद्दल संगीता वारंवार माहेरी वडिलांना फोन वरुन माहिती देत होती. मुलीला त्रास होत असल्याने जावायाची समजुत काढावी यासाठी वडीलांनी धनराज शिरसाठ यांच्या आई-वडीलांची भेट घेत विनंतीही केली होती. आई व वडिलांना मुलगा धनराज याची समजूत काढण्याचे सांगितल्याने लॉकडाऊनपूर्वीच धनराज याचे वडील बाबूलाल नामदेव शिरसाठ व आई सुशिला शिरसाठ असे दोघेही मुलचेरा येथे जावुन आले. गुरुवार (ता.7) रोजी किरकोळ कारणावरुन पती-पत्नीत खटके उडाले..वाद विकोपाला जावून कडाक्‍याचे भांडण होवून संतापाच्या भरात धनराजने त्याच्या सर्विस रिव्हॉल्वर मधुन पत्नी संगीतावर दोन राऊड फायर केले, त्यात एक गोळी कानाला चाटून गेली तर दुसरी मात्र डोक्‍यात शिरल्याची माहिती कुटूंबीयांकडून मिळाली. 

मामा...पप्पाने आईला गोळी मारली.. 
घटना घडल्यानंतर सातवर्षीय भार्गवीने जळगावी मामा गणेश सपके यांना फोन करुन मामावं..पप्पाने मम्मीला गोळी मारली..अशा शब्दात माहिती दिली. कुटूंबीयांनी माहितीची खातर जमा करण्यासाठी मुलचेरा(गडचिरोली) येथील नातेवाईकांना संपर्क करुन खात्री करण्यास व मदतीला जाण्याची विनंती केली, मात्र लॉकडाऊन मुळे जाता येणे शक्‍य नसल्याने त्यांनाही अडचणी आल्यात. 

माहेरची मंडळी मुलचेराकडे रवाना 
घटनेची खात्री झाल्यावर संगीता यांच्या माहेरच्या मंडळींनी तातडीने गडचिरोली निघण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्याची सिमा ओलांडता येणार नसल्याने सपके कुटूंबीयांनी शासकिय परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. परवानगी मिळाल्यानंतर दुपारनंतर हि मंडळी खासगी वाहनाने गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police shoot wife home child