कोतवाल, पोलिस पाटलांचाही विमा काढा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

पोलिसपाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल व आरोग्य विभाग तसेच पोलिस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा 25 लाखांचा विमा उतरविण्यात यावा. अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जळगाव : कोरोना विषाणूंशी लढा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्‍टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका व संबंधित घटकांचा ज्या पद्धतीने केंद्र सरकारने 50 लाख रुपये रकमेचा विमा उतरविला आहे. राज्य सरकारने याच पद्धतीने राज्यातील कोतवाल, पोलिसपाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल व आरोग्य विभाग तसेच पोलिस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा 25 लाखांचा विमा उतरविण्यात यावा. अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पोलिस प्रशासन सतर्क आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवत आहे. गावपातळीवर वित्त आयोगाच्या निधीतून गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एक लाख 70हजार कोटी रकमेच्या पॅकेज मधील मदत संसर्ग टाळण्यासाठी जनतेला घरपोच सेवा देण्याकरिता महसूल विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. या सर्व घटकांनी आपला जीव धोक्‍यात घालून कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. या करिता या सर्व घटकांचा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने 25 लाखांचा विमा उतरविण्यात यावा. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचा 50 लाखांचा विमा उतरविण्याचे धोरण स्वीकारले या बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon policepatil kotwal policy unmesh patil