esakal | "दादा'गिरीचा अस्त, राजकारणही बदलणार 
sakal

बोलून बातमी शोधा

"दादा'गिरीचा अस्त, राजकारणही बदलणार 

"दादा'गिरीचा अस्त, राजकारणही बदलणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात आहेत. यातील काही जण विधानसभेसाठीही इच्छुक होते. त्यामुळे हे पक्ष या शिक्षा झालेले नेते आणि नगरसेवकांबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. जैन यांच्या राजकीय "दादागिरी'चा या निकालाने अस्तच झाला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाची गणितेही आता बदलणार आहेत. 

जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सुरेशदादा जैन व जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुलाबराव देवकर यांचा उमेदवारीचा दावा होता. मात्र, त्यांना शिक्षा झाल्यामुळे ते उमेदवार असण्याची शक्‍यता आता कमीच आहे. जैन यांच्याबाबतीत विचार करावयाचा झाल्यास न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेमुळे त्यांची गेल्या 35 वर्षांपासूनची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. जळगाव पालिकेवरील सत्तेसह तब्बल आठ टर्म आमदार म्हणून ते राहिले आहेत. याच माध्यमातून राज्यातील मंत्रिपदावरही काही काळ ते राहिले आहेत. मात्र, घरकुल गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल चार वर्षे त्यांना जामीन न मिळाल्याने तुरुंगात रहावे लागले होते. याच दरम्यान सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यांचा पराभव झाला. आमदारकीत हा त्यांचा पहिला पराभव होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पराभव पत्करावा लागला अन्‌ गेल्या पस्तीस वर्षांची पालिकेवरील त्यांची सद्दीही संपुष्टात आली. तथापि, पुढे त्यांची विधानसभेला निवडणूक लढण्याची तयारी कायम होती. मात्र, घरकुल प्रकरणाच्या निकालावर सर्व अवलंबून होते. आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्याने त्यांचे राजकीय आव्हानही संपल्याचे दिसत आहे. या शिवाय शिवसेनेचे चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनाही या प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांच्या उमेदवारीवरही शिवसेना काय भूमिका घेणार, याकडेच लक्ष असणार आहे. घरकुलच्या या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकदही कमजोर होईल, हे निश्‍चित झाले आहे. 

देवकरांचे स्वप्न धुळीस 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेमुळे जळगाव ग्रामीणमधील त्याचे उमेदवारीचे आव्हानही संपुष्टात आल्यात जमा आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात सन 2009 मध्ये निवडणूक लढवून देवकर विजयी झाले होते. त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रिपदही मिळाले होते. मात्र घरकुल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना अटक झाल्याने त्यांचे मंत्रिपदही गेले होते. लोकसभा निवडणुकीत देवकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. मात्र, भाजपचे उन्मेष पाटील यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. ते आता पुन्हा जळगाव ग्रामीणमधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारीची तयारी करीत आहेत. मात्र, खटल्यातील शिक्षेमुळे त्यांच्या उमेदवाराचे आव्हानही संपुष्टात आले आहे. त्यांचे विधानसभेचे स्वप्नही त्याबरोबर धुळीस मिळाले आहे. त्या शिवाय राष्ट्रवादीची ताकदही या मतदारसंघात क्षीण होणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून शिवसेनेचे मातब्बर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार राहील, याकडेच लक्ष आहे. 

कॉंग्रेसच नामानिराळी 
सुरेशदादा जैन यांच्या राजकीय कारकिर्दीतील वारसदारावर नेहमीच चर्चा होत आली आहे. मात्र या निकालामुळे त्यांचा वारसदार म्हणून पुढे कोणाचे नाव येणार, याकडेच लक्ष असणार आहे. याच प्रकरणात शिक्षा झालेले नगरसेवक पूर्वी जैन यांच्या गटात होते. त्यातील काही जण आज भारतीय जनता पक्षात आहेत. पारदर्शी भूमिका असणारा भारतीय जनता पक्ष आता शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या बाबतीत काय भूमिका घेणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत या निकालाचे पडसाद निश्‍चित उमटणार आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांना शिक्षा झालेली आहे, तर "भाजप'चे विद्यमान नगरसेवकांनाही शिक्षा झालेली आहे. राष्ट्रवादी नेते देवकरांनाही शिक्षा झाली आहे. केवळ कॉंग्रेस पक्षाचेच कोणीही यात नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर हे घेऊन जाणार, हे निश्‍चित आहे. सत्ताधारी "भाजप' व "शिवसेना' याला काय उत्तर देणार? याची चर्चा आता सुरू आहे. पण सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या पक्षांची कोंडी झालेली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका घरकुलाच्या मुद्यावर गाजणार, हे मात्र नक्की आहे. 
 

loading image
go to top