राज्यातील वीज कर्मचारी संपावर जाणार

दगाजी देवरे
Saturday, 14 November 2020

आर्थिक वर्षात केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक ऊर्जामंत्री, ऊर्जा राज्यमंत्री व तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाने केली. मात्र, चांगल्‍या कामामुळे दर वर्षाप्रमाणे या वर्षीही बोनस, सानुग्रह अनुदान द्यावे, अशी अपेक्षा होती.

म्हसदी  : राज्यातील वीज कंपन्यांतील ८६ हजार वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान व २०१८ मध्ये झालेल्या पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कामगार, अभियंते व अधिकारी संपावर जाणार आहेत, अशी माहिती जळगाव परिमंडल वर्कर्स फेडरेशनचे सहसचिव किरण नांद्रे (शेवाळी) यांनी दिली. 

आवश्य वाचा- कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील - 

संपकरी २५ संघटनांसमवेत चर्चा करून ऊर्जा सचिव असिम गुप्ता व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांनी बोनस, सानुग्रह अनुदान देता येणार नाही, ही भूमिका घेतली. आर्थिक वर्षात केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक ऊर्जामंत्री, ऊर्जा राज्यमंत्री व तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाने केली. मात्र, चांगल्‍या कामामुळे दर वर्षाप्रमाणे या वर्षीही बोनस, सानुग्रह अनुदान द्यावे, अशी अपेक्षा होती.

पगारवाढीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ३७० कोटी व बोनस, सानुग्रह अनुदानासाठी १२५ कोटी अपेक्षित आहेत. पगारवाढीचा फरक देण्यासाठी राज्य विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान ऊर्जा सचिव असिम गुप्ता, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मुख्य औद्योगिक सबंध अधिकारी व २५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, बैठकीत ठोस निर्णय न झाल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon power workers in the state will go on strike