esakal | सद्य:स्थितीत राज्यात राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य : एकनाथराव खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

aknathraw khadse

कोरोनाचा राज्यातील उद्रेक या सर्व बाबींची सध्याच्या राजकीय स्थितीला पार्श्‍वभूमीवर आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत संजय राऊत, शरद पवार, नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली.

सद्य:स्थितीत राज्यात राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य : एकनाथराव खडसे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना मुंबईत राजकारण चांगलेच तापलेले आहे. यात राज्यपालांकडे राजकीय नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी गतिमान झाल्यामुळे सर्वांचे लक्ष राजभवनाकडे लागले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय पालथापालथ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, सद्य:स्थितीत राज्यावर व देशावर कोरोनाचे संकट गडद होत आहे, त्यामुळे अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी व्यक्त केले. या गोष्टींच्या मागे न लागता ठाकरे सरकारने आपले सर्वस्व कोरोनाच्या नियंत्रणावर केंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. तसेच पडद्यामागून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा, त्यानंतर झालेली निवडणूक, यादरम्यान शिवसेनानेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलेली टीका, कोरोनाचा राज्यातील उद्रेक या सर्व बाबींची सध्याच्या राजकीय स्थितीला पार्श्‍वभूमीवर आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत संजय राऊत, शरद पवार, नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. पवारांनी मातोश्रीवर हजेरी लावत उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

याबाबत ज्येष्ठ नेते खडसेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राजकीय नेत्यांनी काही कारणांच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेण्यात गैर काही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची व राज्यपालांची भेट त्यादृष्टीने असू शकेल. त्यातून राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही. आघाडी सरकारमधील कोणत्याही एका पक्षाने ठरविल्याशिवाय या सरकारला धोका निर्माण होण्याचे कारण नाही. त्यामुळे या काळात राजकीय उलथापालथ होईल, याची शक्‍यता जवळपास शून्य टक्के आहे. 

कोरोनावर लक्ष केंद्रीत करावे 
अशा वेळी सर्वांनी राजकारण करण्यापेक्षा आता वाढत्या कोरोनावर नियंत्रण कसे मिळावे यासाठी विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आमची हेच म्हणणे आहे की कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतेने गंभीर लक्ष 
घालावे. सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने आणखी काही कठोर पावले उचलून नियंत्रण 
घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी विरोधीपक्ष सहकार्य करेल असे मत खडसेंनी मांडले. 
 

loading image