ज्वारी, मका खरेदीसाठी जिल्ह्यात 15 केंद्र- मंजुरीसाठी प्रस्ताव सादर

सुधाकर पाटील
बुधवार, 13 मे 2020

पहिल्यांदाच रब्बीत खरेदी 
राज्यात यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भरड धान्याची खरेदी केली जात नव्हती. पण अनेक जिल्ह्यांमध्ये मका आणि ज्वारी पिकांची रब्बीत जास्त प्रमाणात पेरणी केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी मागणी "सकाळ'ने लोकप्रतिनिधींकडे रेटून धरली होती. त्या अनुषंगाने प्रथमच रब्बी हंगामातील भरड धान्याची खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

भडगाव ः शासनाने ज्वारी व मका खरेदीचे आदेश दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात 15 खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी केला असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर तत्काळ खरेदी केंद्र सुरू होतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी "सकाळ'ला सांगितले. त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसांत प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. रब्बी हंगामात राज्यात ज्वारी व मक्‍याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन हाती आले आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केले जात आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे हित पाहता ज्वारी व मका हमीभावाने खरेदी करावेत, अशी मागणी "सकाळ' लावून धरली. "सकाळ'च्या भूमिकेला साथ देत लोकप्रतिनिधींनी व शेतकरी नेत्यांनी शासन दरबारी हा विषय रेटून धरला होता. अखेर शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. 

मार्केटिंग फेडरेशनचा प्रस्ताव 
शासनाच्या अन्न, नागरी व पुरवठा विभागाने ज्वारी व मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी आज 15 ठिकाणी म्हणजे प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी एक खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. 

जिल्हाधिकारी देतील मंजुरी 
खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर मार्केटिंग फेडरेशन खरेदी केंद्र सुरू करेल. त्यानंतर ऑनलाइन नोंदणीने ज्वारी व मका खरेदी केला जाणार आहे. दरम्यान, खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना माल देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे तत्काळ खरेदी केंद्र सुरू होणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon purchesing center for jawar