अबालवृद्ध, वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे. 
दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच सुरत मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी गेट वारंवार बंद होत असल्याचे याठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले. 

जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे. 
दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच सुरत मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी गेट वारंवार बंद होत असल्याचे याठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले. 

दोनवेळा पत्रव्यवहार करून देखील दखल नाही 
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेपूल पाडण्याअगोदर महापालिकेने शिवाजीनगरवासीयांसह नागरिकांची पर्यायी व्यवस्था करावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका प्रशासनासोबत दोन वेळा पत्रव्यवहार केला होता. मात्र महापालिकेकडून या पत्राची दखलच घेतली गेली नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. 

खोदकामासाठी तीन आठवडे 
दोन जेसीबी, ट्रॅक्‍टर यांसह 25 ते 30 रेल्वेचे कर्मचाऱ्यांकडून उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सकाळपासून सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात पुलाचे खोदकाम करण्यात येणार असून, यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे 

तगडा पोलिस बंदोबस्त तैनात 
पूल तोडण्यास सुरवात करण्यापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पोलिस प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी रेल्वेचे कर्मचारी पुलावर हजर होण्यापूर्वीच पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त पुलाजवळ तैनात करण्यात आला होता. 
 
रेल्वेट्रॅक ओलांडणे जीवघेणे 
पूल तोडण्यासाठी सकाळपासूनच सुरवात झाल्याने सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी व कामावर जाणाऱ्यांना चांगलाच फटका बसला. दरम्यान काही नागरिक तहसील कार्यालय, भादली रेल्वेगेट याठिकाणी दुचाकी व सायकल घेऊन रेल्वेरुळ ओलांडताना दिसून येत असल्याने नागरिक पहिल्याच दिवशी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन शहरात यावे लागत आहे. 

या पर्यायी मार्गांचा केला जातोय वापर 
शिवाजीनगर दूध फेडरेशनमार्गे रेल्वेगेट ओलांडून रेल्वे हद्दीतील रस्त्याने पिंप्राळा रेल्वेगेटकडून, एसएमआयटी कॉलेजकडून समांतर बजरंग बोगद्यातून, तसेच जुनी जैन पाईपकडून गुजराल पेट्रोल पंपमार्गे महामार्ग हा पर्यायी मार्ग नागरिकांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

तासभर आधी निघावे लागेल घरातून 
पूल तोडल्यानंतर शहरात येण्यासाठी सुरत रेल्वेगेट हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. याठिकाणी सकाळपासूनच वाहनांची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरात येण्यासाठी तासभर आधी घरातून निघावे लागले तरच त्यांनी ठरविलेल्या नियोजित वेळेत ते शहरात त्यांना पोचता येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर झळकत आहे. 

शॉर्टकट रस्ता ठरतोय जीवघेणा 
ममुराबाद, चोपडा, यावल यासह शहरालगत असलेल्या खेड्या पाड्याचे अनेक लोक शिवाजीनगरच्या उड्डाणपुलावरून शहरात येत होते. आता तर हजारो नागरिकांचा शहरात येण्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक शहरात येण्यासाठी पर्यायी व शॉर्टकट मार्ग म्हणून रेल्वे रुळाचा वापर करीत आहे. त्यामुळे याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

पोलिसांकडून वाहतूक "कंट्रोल' होईना 
शिवाजीनगरच्या पुलावरून होणारी संपूर्ण वाहतूक ही दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटमार्गे वळविण्यात आली आहे. सकाळपासूनच याठिकाणी एसटी, ट्रक यासह दुचाकींची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी लोहमार्ग पोलिस व शहर वाहतूक पोलिसांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या पोलिसांकडून वाहतूक "कंट्रोल' होत नसल्याने ते देखील हतबल झाले आहे. 

नागरिकांकडून संताप, शिवीगाळ 
शिवाजीनगरवासियांसाठी पर्यायी मार्ग न करता पुलाच्या खोदकामाला सुरवात करण्यात आली असल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच तासनतास वाहतुकीच्या कोंडी नागरिक अडकून पडलेले असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनीधींसह सत्ताधारी व आयुक्तांना चांगलीच शिव्यांची लाखोली वाहिली. 

"मनपा'चे ढिसाळ नियोजन 
शिवाजीनगरला पर्यायी मार्ग म्हणून शनिमंदिरामार्गे वाहतूक वळविण्यात येणार होती. मात्र महापालिका प्रशासनाने शिवाजी नगरचा पूल तोडण्या अगोदरच शनिमंदिराकडे जाणाऱ्या लेंडीनाल्यावर असलेल्या पूल तोडून ठेवला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गच बंद झालेला असल्याने महापालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. 

...तर महिनाभरात पर्यायी व्यवस्था 
शहरातील ममुराबादरोडवरील चौथी रेल्वेलाईन टाकण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ममुराबाद व शिवाजीनगरमधील दुचाकीस्वारांना चौघुले प्लॉट, कांचननगर व वाल्मीक नगरमार्गे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. याबाबत महापालिकेचे अधिकारी रेल्वेप्रशासनासोबत चर्चा करणार असल्याची महापालिकेतील सूत्रांनी दिली. 

ममुराबाद रेल्वेलगतचा रस्ता खुला 
ममुराबादरोडवर रेल्वेब्रीजजवळून रेल्वेरुळालगत मनपाच्या हद्दीचा कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावर नागरिकांनी झोपड्या व पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. शिवाजीनगरवासीयांना हा रस्ता पर्याय म्हणून सुरू करण्यासाठी महापालिकेकडून जेसीबीच्या साह्याने हा रस्त्याचे सपाटीकरण करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वार व रिक्षा ही वाहने जात असल्याने या पर्यायी मार्गाचा नागरिकांकडून वापर केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon railway brige student harsment