esakal | लुटमार : वीस रूपयाची बाटली 70 रूपयाला 
sakal

बोलून बातमी शोधा

railway water

मुंबई, दिल्लीहून सुटणाऱ्या काही रेल्वे जळगावला थांबतात. जळगाव रेल्वेस्थानकात पाणपोई आहेत मात्र त्यांचे नळ तुटलेले आहेत. त्यात पाणी नाही. जी मंडळी पाण्याच्या बाटल्यांची विक्री करते ते 20 रुपयांची पाण्याची बाटली 50 ते 70 रुपयांना विकते.

लुटमार : वीस रूपयाची बाटली 70 रूपयाला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेल्वे सध्या बंद असल्या, तरी मुंबई, दिल्लीहून थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात जाण्यासाठी परप्रांतीयांना विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वे जळगावस्थानकावर थांबल्यावर स्थानकात पाण्याची बाटली चक्क 50 ते 70 रुपयांना विकून प्रवाशांची लूट केली जात आहे. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस, आरपीएफ पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. 
मुंबई, दिल्लीहून सुटणाऱ्या काही रेल्वे जळगावला थांबतात. जळगाव रेल्वेस्थानकात पाणपोई आहेत मात्र त्यांचे नळ तुटलेले आहेत. त्यात पाणी नाही. जी मंडळी पाण्याच्या बाटल्यांची विक्री करते ते 20 रुपयांची पाण्याची बाटली 50 ते 70 रुपयांना विकते. प्रवासी गरज म्हणून ही महागडी पाण्याची बाटली खरेदी करतात. तोच प्रकार विविध बिस्कीट पुडे, खाद्यपदार्थ विक्रीबाबत घडतो. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची लूट होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. 

नळ तुटके का? 
गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वेगाड्या बंद आहेत. असे असताना रेल्वेस्थानकातील तुटके नळ, इतर दुरुस्तीस रेल्वे प्रशासनाला वेळ होता. मात्र, रेल्वे प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने प्रवाशांना पाण्याविनाच राहावे लागत आहे. 

आरक्षण सुरू; प्रतिसाद नाही 
जळगाव रेल्वेस्थानकात रेल्वेने आरक्षण सुविधा सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. केवळ परप्रांतात जाणारे प्रवाशीच येऊन आरक्षण करीत आहेत.