esakal | यंदाची सप्तरंगी होळी भारतीय रंग.. पिचकाऱ्यांनी!
sakal

बोलून बातमी शोधा

holi color

यंदाची सप्तरंगी होळी भारतीय रंग.. पिचकाऱ्यांनी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : होळीच्या सणानिमित्त लागणाऱ्या पिचकारी व रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. खासकरून धूळवडीसाठी लहान मुलांसाठी बाजारात विविध आकाराच्या पिचकाऱ्या विक्रीस आल्या असून, बालचमूंकडून पब्जीच्या पिचकारीला विशेष मागणी होत आहे. "कोरोना'मुळे चिनी पिचकारी व रंग बाजारातून गायब झाले असून, देशी बनावटीच्या दिल्ली मेड पिचकारी व रंगांना चांगले दिवस आले आहेत. 

"कोरोना'मुळे स्वदेशी रंगांना मागणी 
यावर्षी रंगाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. सर्व रंगांच्या गुलालासह गणेश, मुर्गा, तोता ब्रॅण्डच्या रंगाला जास्त मागणी आहे. रंगांची किंमत 25 ते 100 रुपयांपर्यंत आहे. यात गोल्डन रंग, वॉर्निश आणि उत्तम क्वॉलिटीच्या पॅक रंगांची मागणी वाढली आहे. लिक्विड रंगाला लोकांची पसंती आहे. धुलिवंदनासाठी लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हिरवा, पिस्ता, भगवा, नारंगी, पिवळा असे नैसर्गिक रंग पाऊचमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. इको रेंडली होळी खेळण्यासाठी साबुदाणाच्या पीठापासून बनवलेल्या रंग, हर्बल रंग आणि गुलालाला ग्राहकांकडून पसंती आहे. 

पिचकारींच्या किमतीत वाढ 
मुलांना धुळवडीचे वेध लागले असून, पिचकारीचे अधिक आकर्षण असल्यामुळे बाजारपेठांमध्ये होळी पिचकारीला मागणी वाढली आहे. यावर्षी किंमतीत 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. यात स्पायडर मॅन, सर्जिकल स्ट्राईक गन, तसेच दिल्ली मेड पिचकारीची बाजारात चलती दिसत आहे. पब्जी पिचकारी 180 रुपयांपासून 500 ते 600 रुपये, युनिकोन 300 ते 400 रुपये, गुजराती ड्रम 200 ते 500 रुपये छत्री व मछलीवाली पिचकारी अनुक्रमे 150 ते 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत. कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्विड, मॅजिक कलर, कॅप्सूल यांसारखे प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. 

नैसर्गिक रंगांना मागणी 
राजू चौधरी (पिचकारी व रंग विक्रेता) : होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. रंग, पिचकारींच्या किमतींमध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांकडून हर्बल आणि नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे. 

दिल्ली मेड पिचकऱ्यांना मागणी 
गणेश मोहरकर (विक्रेता) : होळीनिमित्त लहान मुलांना रंगपंचमीचे व धुळवडीचे वेध लागले आहेत. मुलांना पिचकारीचे अधिक आकर्षण असल्यामुळे विविध आकाराच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक भारतीय सणाला चिनी वस्तू बाजारांवर कब्जा करतात. कोरोनामुळे चिनी पिचकाऱ्यांची आयात झाली नसल्याने दिल्ली मेड पिचकऱ्यांना मागणी आहे.