पथराडे शिवारातील केळी पोचली जम्मू-काश्मीरला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी उत्पादकांनाही चांगला भाव मिळू लागला आहे. वढोदा प्र. यावल येथील शेतकरी पंडित राजाराम सोळंके यांची पथराडे शिवारात शेती आहे. त्यांनी जैन कंपनीची टिश्‍यू केळीची तीन हजार दोनशे रोपे लागवड केली होती. ८१० झाडांची कापणी करून १५३ क्विंटल केळी जम्मू- काश्मीरला रवाना झाली.

चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी उत्पादकांनाही चांगला भाव मिळू लागला आहे. वढोदा प्र. यावल येथील शेतकरी पंडित राजाराम सोळंके यांची पथराडे शिवारात शेती आहे. त्यांनी जैन कंपनीची टिश्‍यू केळीची तीन हजार दोनशे रोपे लागवड केली होती. ८१० झाडांची कापणी करून १५३ क्विंटल केळी जम्मू- काश्मीरला रवाना झाली. जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते केळीची कापणी करून केळीने भरलेला ट्रॉला रवाना करण्यात आला. साकळी येथील शेतकरी सुभाष महाजन व योगेश फर्टिलायझरचे बाळू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका गरीब शेतकऱ्याची केळी प्रथमच जम्मू- काश्मीरला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे. केळीच्या झाडाची एक-एक फणी छाटणी करून ‘ट्रे’ भरण्यात आले. यावेळी थोरगव्हाण येथील माजी उपसरंपच समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता संदीप सोनवणे, बाळू शिंपी, पथराडे येथील हरिभाऊ पाटील उपस्थित होते. मनवेल, थोरगव्हाण, पथराडे परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. दरवर्षी उन्हाळ्यात चक्रीवादळाचा मोठा फटका केळीला बसत असल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असते. गेली दोन ते तीन वर्षे केळी उत्पादकांची हलाखीची गेली. यंदा मात्र निसर्गाने साथ दिल्याने चक्रीवादळाचा फटका केळी उत्पादक यावल परिसराला बसला नाही. त्यामुळे केळी पिकाने जोर धरला असून, जळगाव जिल्ह्यातून प्रथमच केळी जम्मू- काश्मीरला रवाना झाली. आंब्याचे आगमन झाल्याने केळीचे भाव पडतील, अशी शंका असताना इराकने हात दिला आणि आज १४०० पर्यंत भाव केळीला मिळू लागला आहे. त्यामुळेही शेतकरीवर्गात समाधान आहे. मात्र, रावेरपासून ४५ किलोमीटरवरील मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरला केळीला दोन हजारांपर्यंत भाव दिला जात आहे. मध्य प्रदेशात चांगले रस्ते असल्याने त्यावरून वाहतूक करताना केळीचे नुकसान होत नाही. उलट रावेर व यावल परिसरातील रस्ते सपाट नसल्याने केळीचे घड वाहतूक करताना एकमेकांवर आदळले जातात. यामुळे केळी खराब होऊन याचा परिणाम दरावर होत असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon raver banana jammu kashmir