आशादायी बातमी... रुग्णांसाठी "रेडक्रॉस'ने सुरू केला फिरता दवाखाना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

रेडक्रॉसने फिरता दवाखानाम्हणून एक व्हॅनच तयार केली. त्यात दोन डॉक्‍टर, एक नर्स, तीन स्वयंसेवक असतात. फिरत्या दवाखान्याची व्हॅन विविध उपनगरात जाते.

जळगाव ः "कोरोना'मुळे देश लॉकडाऊन आहे. संचार बंदी सुरू आहे. अनेक खासगी डॉक्‍टरांची रुग्णालये बंद आहेत. यामुळे रुग्ण विविध नगरात उपचाराविना घरीच आहे. त्यावर उपाय म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हाशाखेतर्फे शहरात फिरता रेडक्रॉस दवाखाना सुरू करण्यात आला आहे.यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसात दोनशेच्यावर रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या भीतीमुळे विविध भागात, उपनगरातील खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. साधा थंडी, ताप, खोकल्यावरही औषधोपचार होत नाही, ही स्थिती लक्षात घेता रेडक्रॉसने फिरता दवाखानाम्हणून एक व्हॅनच तयार केली. त्यात दोन डॉक्‍टर, एक नर्स, तीन स्वयंसेवक असतात. फिरत्या दवाखान्याची व्हॅन विविध उपनगरात जाते. तेथे जाण्याअगोदर संबंधित वॉर्डातील नगरसेवकाला संपर्क साधून त्या वॉर्डात फिरता दवाखाना येणार आहे, ज्यांना गरज आहे त्यांनीच अमुक वेळेत संपर्क साधा. त्यानुसार नगरसेवक वॉर्डात सूचना देतात. फिरत्या दवाखान्याची व्हॅन आली की रुग्ण अंतरा अंतराने तपासणीसाठी जातात. अगोदर या रुग्णांचे सॅनिटायझेश केले जाते. रुग्णांना मास्क लावणे, सतत हात धुण्यास सांगितले जात आहे. सॅनिटराईज्ड झाल्यानंतर डॉक्‍टर रुग्णांची तपासणी करून तीन दिवसांची औषधी दिली जाते आहे. आतापर्यंत शहरातील कांचननगर, दिनकरनगर या परिसरात रुग्णांची तपासणी केली. याप्रमाणे विविध भागात फिरता दवाखाना नेऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे. 

आज या भागात दवाखाना 
फिरता दवाखाना आतापर्यंत कांचन नगर, गोपाळ पुरा, दिनकर नगर, श्रीकृष्ण नगरात नेला.उद्या (ता.5) निमखेडी, आहुजा नगरात तर परवा (ता.6) हरिविठ्ठल नगर, मोहन नगरात नेण्यात येणार आहे. 

रुग्णांपर्यत जाऊन सेवा 
संचारबंदीत अनेक रुग्णांना घराबाहेर पडणे शक्‍य नाही. खासगी दवाखानेही बंद आहेत. अशा रुग्णांना त्यांच्या परिसरात जाऊन सेवा देण्याची संकल्पना मला सुचली. रेडक्रॉसतर्फे आपण फिरता दवाखाना करून रुग्णांना सेवा देवू शकतो, ही बाब जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना सांगितली. त्यांनी त्याला होकार देताच फिरता दवाखाना सुरू करून मोफत औषधांचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी यांनी "सकाळ' ला दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Redcross opened a hospital for patients