शिक्षक, तलाठी, ग्रामसेवकांची धान्य वाटपाच्या माहितीसाठी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

केशरी कार्ड धारक ज्यांची युनिट रजिस्टरला नोंद आहे त्यांनाच एक ते दहा मे दरम्यान धान्य मिळेल. त्यांनी या तारखाना आपल्या रेशन दुकानात जावून धान्य घ्यावे. गर्दी करू नये, सोशल डिस्टन पाळावे. दुकानदारांना रेशनचा पुरवठा संबंधित तारखेच्या अगोदर करण्यात येईल.
सुनिल सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

जळगाव : ‘कोरोना’संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशाकाळात कार्ड धारकांना रेशन दुकानांवरील रेशन माल आला याची माहिती देणे, प्रत्येक कार्डावर प्रती सदस्य किती धान्य मिळेेल याची माहिती कार्ड धारकांपर्यंत पोचविण्याठी आता जिल्हयातील काही माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवकांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली आहे. ज्या केशरी कार्ड धारकांची नोंद तहसिल कार्यालयातील युनिट रजिस्टरमध्ये आहे अशानाच मे व जून महिन्यात धान्य मिळणार आहे. ज्यांची नोंद नसेल त्यांना धान्य मिळणार नसून ते बोगस म्हणून समजले जाणार आहेत.

नक्‍की पहा -  कोरोनाग्रस्त महिलेचा मुंबई- औरंगाबाद प्रवास; संपर्कातील १४ जण जळगावला रवाना

राज्य शासनाने केशरी शिधापत्रीका धारकांनाही प्रती मानसी पाच किलो धान्य देण्याचे नियोजन केले आहे. येत्या मे व जून महिन्यात एक ते दहा तारखे दरम्यान फक्त याच लाभार्थ्यांना हे धान्य मिळेल. मात्र या केशरी कार्ड धारकांची नोंद तहसिलकार्यालयातील युनिट रजिस्टरमध्ये झालेली असणे गरजेचे आहे. त्याबाबत संंबंधित तहसिलदार दुकानदारांना संबंधित कार्ड धारकांची नावे देतील. यामुळे ज्यांची नोंद असेल त्यांनाच धान्य दुकानदार धान्य देईल. इतरांना देणार नाही कारण त्याची नाेंदच झालेली नसेल. असे कार्ड बोगस असतील, ते यानिमित्ताने समोर येतील. अशांवर यावेळी मात्र कारवाई करण्यात येणार आहे.

क्‍लिक करा - राज्यात तात्पुरत्या पा. पु.योजनांच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ : मंत्री गुलाबराव पाटील

सर्वच प्रकारच्या कार्ड धारकांना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळावे यासाठी त्याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांची नियुक्ती केली आहे. हे धान्य वाटपाबाबत माहिती देवून, कोणाच्या वाटयाला किती धान्य आहे हे सांगतील. रेशन दुकानात सोशल डिस्टन्स पाळले जाते किंवा नाही याबाबत लक्ष ठेवतील. या अनुषंगाने रेशन दुकानदारावर एक प्रकारचा धाकही राहील व ताे धान्याचे योग्य प्रमाणात वाटप करेल.

‘केशरी’चे 13 लाख लाभार्थी
जिल्हयात सध्या धान्य मिळत नसलेले 3 लाख 12 हजार 649 केशरी कार्ड धारक आहेत. त्यात 13 लाख 47 हजार 830 सभासदांना प्रत्येकी पाच किलो धान्य (तीन किलो गहू (8 रूपये दर), दोन किलो तांदूळ (12 रुपये दर) मिळेल. सकाळी 7 ते दूपारी 12 व दूपारी 4 ते रात्री 10 अशा वेळेत धान्य वाटप होईल.

असे मिळणार धान्य
1 ते 10 तारखे दरम्यान--फक्त केशरी कार्ड धारकांना
11 ते 20--फक्त प्राधान्य कुटूंब व अंत्योदय कार्ड धारक
21 ते 30--पाच किलाे तांदूळ मोफत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon reshan inquiry appoen teacher talathi and gramsevak