रेशन दुकानांची वेळ 7 ते 12, 4 ते 10

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

आकडे बोलतात.. 
एकूण कार्डधारक-- 5 लाख 97 हजार 198 कार्डधारक 
 लाभार्थी--27 लाख 21 हजार 251 
 अंत्योदय योजना-- 1 लाख 32 हजार 213 कार्डधारक 
 लाभार्थी--- 6 लाख 15 हजार 203 
 प्राधान्य कुटुंब योजना-4 लाख 64 हजार 985 कार्डधारक 
 लाभार्थी-- 21 लाख 56 हजार 48 ​

जळगाव : रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना धान्य घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 10 अशी करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात 6 हजार 358 मेट्रिक टन धान्य वाटप झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली. 

"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानदारांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करीतच वितरण करावे. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. अन्नधान्याचे वाटप देखील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत सुरू करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या-त्या महिन्यात वाटप होईल. 

अंत्योदय योजनेत 35 किलो धान्य 
या महिन्यात अंत्योदय योजना , प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. ई-पॉस मशिनवर वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महिन्यात अंत्योदय योजनेचे कार्ड असणा-या लाभार्थ्यांना महिन्याच्या नेहमीच्या नियतनाप्रमाणे गहू 23 किलो, ज्वारी 3 किलो, तांदूळ 9 किलो असे एकूण प्रति कार्ड 35 किलो नियमित धान्य मिळेल. प्राधान्य कुटुंबांना पाच किलो धान्य प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याच्या नेहमीच्या नियतनाप्रमाणे प्रति लाभार्थी गहू 3 किलो व तांदूळ 2 किलो मिळेल. 

उद्यापासून तांदूळ मोफत 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल महिन्यासाठीच्या मोफत तांदळाचे नियतन तालुक्‍यांच्या गोदामात पोहोच करण्याची कार्यवाही उद्या(ता. 6) पासून सुरू होईल. तालुका गोदामात हा तांदूळ आल्यावर तालुक्‍यातील दुकानदारांना पोहोच केला जाईल. दुकानात तांदूळ आल्यावर या मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. लाभार्थ्यांनी सर्वप्रथम एप्रिलचे धान्य घ्यावे. मोफत तांदूळ लवकरच स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध होईल. 
 
ई-पॉसद्वारे तांदूळ वाटप 
तांदळाचे लाभार्थ्यांना ई-पॉसद्वारे मोफत वितरण करण्यात येईल. तांदळाचे वाटप करताना लाभार्थ्यांनी त्या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे याची खातरजमा करण्यात येईल. 

 

जिल्ह्यात 6 हजार 358 मेट्रिक टन धान्य वाटप 
स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरू आहे. 1 ते 6 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील 3 लाख 11 हजार 207 शिधापत्रिका धारकांना तब्बल 6 हजार 358 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती श्री. सूर्यवंशी यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon reshan shop time declear collector lockdown time