सुटीच्या दिवशी "आरटीओ'त चोरट्यांची जत्रा 

सुटीच्या दिवशी "आरटीओ'त चोरट्यांची जत्रा 

जळगाव : आदर्शनगरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) प्रशस्त कार्यालय आहे. जिल्ह्याभरात होणाऱ्या कारवाईतील वाहने जप्त करून या कार्यालयाच्या आवारात आणून ठेवली जातात. शनिवार-रविवार कार्यालयाच्या सुटीच्या दिवशी भरदिवसा चोरटे या जप्त वाहनातील साहित्य लांबविण्यासाठी कंपाउंड ओलांडून मुक्कामीच थांबून चोऱ्या करतात. आवारातून अनेक दिवसांपासून चोऱ्या सुरू होत्या. मात्र, आज सकाळी दोन चोरटे वाहनातून चोरी करताना आढळून आले असून, त्यांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेली वाहने उभी करण्यात येतात. गेल्या अनेक दिवसांपासून या वाहनातील साहित्य, टायर, स्पेअरपार्ट, बॅटऱ्या चोरीला जात असल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी होत्या. मात्र, कार्यालयाने स्पष्टपणे या प्रकरणात हात वर करून आपली जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केल्याने ज्या वाहनातील साहित्य चोरी करण्यात येत होती, तोही तक्रार करत नव्हता आणि आरटीओ कार्यालय आपली जबाबदारी नाही म्हणून निश्‍चिंत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत होते. शनिवार, रविवार सुटीचा दिवस हेरून भरदिवसा किंवा सायंकाळी चोरटे कंपाउंडमध्ये शिरून जप्त केलेल्या वाहनांतील साहित्य, टायर काढून नेत होते. आज तशाच पद्धतीने सकाळी साडेअकराला तांबापुरातील रहिवासी प्रकाशसिंग मितसिंग बावरी (वय 28), हिंमतसिंग चरणसिंग बावरी (वय 30) हे दोघेही जप्त केलेल्या वाहनांतून साहित्य काढत होते. आवारातील उभी बलेरो कारमधून (एमएच 19, एस 5968) जॅक काढला, इतर एका वाहनातूनही जॅक बाहेर काढत असताना पहारेकरी पुरुषोत्तम हिरालाल दुबे यांना शंका आली, सोबत कार्यालयातील वाहनचालक वसंत आगलावे, एजंट आकाश मधुकर सुरवाडे यांनी रामानंदनगर पोलिसांना कळवून पाळत ठेवत दोघांना रंगेहात पकडले. चौकशी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याविरुद्ध पुरुषोत्तम दुबे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

..अन चोरटे गजाआड 
पहारेकरी पुरुषोत्तम दुबे, शासकीय वाहनावरील चालक वसंत आगलावे आणि एजंट आरटीओ कार्यालयाच्या भिंतीला लागून उभ्या गाडीवर नास्ता करीत असताना त्यांना शंका आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता दोघा भामट्यांनी बलेरो गाडीतून जॅक बाहेर काढला. इतर वाहनांचीही चाचपणी करीत असल्याने तत्काळ पोलिसांना फोन करून बोलावून चोरट्यांना पकडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com