esakal | व्याघ्र प्रकल्पाचे "बफर क्षेत्र' वाढविण्याचा प्रयत्न 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

"सकाळ'ने "वनक्षेत्रातील वणवा' या मालिकेंतर्गत याबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा परिणाम म्हणूनही या चर्चेत मुद्दे उपस्थित झाले. महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये हे गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज सायंकाळी त्यांच्यासमवेत जळगाव वनविभागाच्या कार्यालयात निसर्गसंवर्धन चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली.

व्याघ्र प्रकल्पाचे "बफर क्षेत्र' वाढविण्याचा प्रयत्न 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : यावल अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमणे सुरू असून, शिकारी आणि चोरटा व्यापार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे यावल अभयारण्याच्या संरक्षणासाठी व्यापक कृती योजना तयार करावी, अशी आग्रही मागणी निसर्गसंवर्धन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पाचे "बफर क्षेत्र' वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. 
"सकाळ'ने "वनक्षेत्रातील वणवा' या मालिकेंतर्गत याबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा परिणाम म्हणूनही या चर्चेत मुद्दे उपस्थित झाले. महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये हे गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज सायंकाळी त्यांच्यासमवेत जळगाव वनविभागाच्या कार्यालयात निसर्गसंवर्धन चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक आणि धुळे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अंजनकर, कळसकर, वनाधिकारी डी. आर. पाटील, आर. जी. पाटील उपस्थित होते; त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी मंडळात राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, राजेश ठोंबरे, वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे, अमन गुजर, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, फालक, उमेश इंगळे, उमेश पाटील आदींनी सहभाग घेतला. 
बैठकीत प्रामुख्याने यावल वनविभागात वाघाचे अस्तित्व आढळून आले असून, अजूनही मोठ्या प्रमाणावर वन्यजीवन यावल वनविभागात अस्तित्वात आहे. त्यामुळे 2013 मध्ये तयार करण्यात आलेला मेळघाट- वडोदा यावल अभयारण्य- अनेर अभयारण्य, तोरणमाळ आणि शुलपाणेश्वर (गुजरात) व्याघ्र संचार मार्गांचा प्रस्ताव त्वरित मंजूर झाल्यास यावल आणि अनेर अभयारण्याचे संवर्धन होईल, तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिनिधी मंडळाच्या वतीने श्री. लिमये यांना सांगण्यात आले. तसेच वनहक्क कायद्यातील तरतुदीनुसार यावल अभयारण्याला "क्रिटिकल वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा का देण्यात आला नाही? याविषयी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रक्रिया सुरू असून, लवकरच "क्रिटिकल वाइल्ड लाइफ'चा दर्जा मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच संचार मार्गांच्या प्रस्तावाची समीक्षा करण्यात येऊन नव्याने प्रस्ताव तयार केला जाण्यासंदर्भातही त्यांनी आश्वासन दिले. यावल अभयारण्याव्यतिरिक्त मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र आणि तेथील व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीनेही सर्वंकष चर्चा करण्यात आली. 

मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "बफर झोन'मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्या; त्याचप्रमाणे "क्रिटिकल वाइल्ड लाइफ हॅबिटॅट'ची प्रक्रिया सुरू झाली असून, याअनुषंगाने समिती स्थापन करण्यात आली असल्याचे जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू. पगार यांनी सांगितले. डोलारखेड येथील शेतकऱ्यांना यथायोग्य मोबदला देऊन त्यांची व्याघ्रसंवर्धनासाठी जोडण्याविषयीची चर्चा वनविभागाची स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू असून, याविषयीची कार्यवाही उच्चस्तरावरून करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. 

बैठकीत चर्चेत आलेले काही ठळक मुद्दे 
- महाराष्ट्र शासनाने वडोदा वनक्षेत्रास मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र घोषित केले आहे; परंतु या क्षेत्रातील वाघांच्या संवर्धनासाठी ही प्रक्रिया पुरेशी नाही, हे सिद्ध झाले असून, आजतागायत वेगवेगळ्या कारणांनी तीन वाघ मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे डोलरखेडा वनक्षेत्रास "क्रिटिकल टायगर हॅबिटॅट' (धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र) घोषित करणे आवश्‍यक आहे. 
- संबंधित वनक्षेत्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "बफर'मध्ये समावेश झाल्यास गावांच्या सर्वंकष विकासासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात येतील आणि वाघांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. 
- डोलरखेडा वनक्षेत्राच्या मधोमध दोनशे एकर जमीन 17 शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेती कसावी लागते. ही शेतजमीन जर CA (compnsatory Afforstration) अंतर्गत खरेदी करण्यात आली, तर शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल आणि वाघांसाठी विस्तृत क्षेत्र उपलब्ध होईल.
 

loading image