esakal | Loksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल 
sakal

बोलून बातमी शोधा

shirish choudhari

Loksabha 2019 : मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच धडा शिकवेल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेणार. त्यांची माणसेच राज्य व्यवस्थेवर कब्जा करून आहेत, हे सरकार लोकशाहीची संकल्पनाच मोडीत काढायला निघालेले आहेत. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या केंद्र सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर जी टीका केली होती तीच आता त्यांना लागू होत आहे. त्यांचे सरकार मजबूत नसून हुकूमशाही, एकाधिकारशाही, हिटलरशाही राबवणारे सरकार आहे. केंद्र सरकारबद्दलची नाराजी जनतेच्या मनात आहे. जनता हे सर्व ओळखून आहे. सुज्ञ मतदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमागे उभे राहतील, असा विश्वास प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

प्रश्न : केंद्रामधील मोदी सरकारच्या कार्याचे मूल्यमापन आपण कसे कराल? 
शिरीष चौधरी : केंद्रातील मोदी सरकारने जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता गेल्या पाच वर्षांत झालेली नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. न्यायालय, रिझर्व बँक, नियोजन आयोग, केंद्रीय गुप्तचर विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्वायत्तता संपली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाला आहे. देशाची परिस्थिती अस्थिर झाली आहे. राजकारणापासून सैन्याला नेहमी अलिप्त ठेवण्याचीच भारतीय परंपरा आहे; पण ती मर्यादाही या सरकारने ओलांडली आहे. सगळ्याच पातळीवर मोदींचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. 

प्रश्न : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल आपल्याला काय वाटते? 
शिरीष चौधरी : भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी राहुल गांधींची पप्पू म्हणून थट्टा केली; परंतु तीन राज्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळालेले यश पाहता त्यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. नरेंद्र मोदी मोठे की राहुल गांधी मोठे हा प्रश्न निरर्थक असून, सामान्य मतदार आणि जनता मोठी आहे. तिचा कौल महत्त्वाचा असणार आहे. 

प्रश्‍न : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातील उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या विजयाबद्दल आपले काय आडाखे आहेत? 
शिरीष चौधरी : जळगाव जिल्हा आणि विशेषतः रावेर मतदार संघाचा भाग हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आजही या भागात काँग्रेस विचारांचे समर्थक, मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. डॉ.उल्हास पाटील यांना उमेदवारी काहीशी उशिरा जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांची जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ओढाताण, धावपळ होत आहे. १८०० गावे आणि ३००० मतदान केंद्रांपर्यंत पोहचणे अवघड असले तरीही अशक्य नाही. उमेदवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती आणि आकर्षण दिसत आहे. मी रावेर विधानसभा मतदारसंघात फिरताना याचा अनुभव घेत आहे. सर्व धर्माच्या आणि जातीच्या मतदारांमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. 

प्रश्न : गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसच्या सरकारने देशात काहीच केले नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी करताहेत? 
शिरीष चौधरी : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत देश उभा केला, विकासाच्या असंख्य योजनांची पायाभरणी केली. ज्या देशात छोटीशी सुई तयार होत नव्हती. तिथे प्रचंड मोठे मोठे कारखाने, धरणे, विद्युत प्रकल्प, संरक्षण सामग्री तयार करणारे प्रकल्प, कृषी विकास, शैक्षणिक विकास हा मूलभूत विकास काँग्रेसच्या काळात झाला आहे. हे सर्व माहीत असुनही काँग्रेसवर टीका करणे म्हणजे नादानपणा आहे. 

loading image