सेंद्रिय धान्याची मागणी वाढली; पिकविणाऱ्यांची मात्र संख्या तोकडी! 

देविदास वाणी
मंगळवार, 9 जुलै 2019

जळगाव ः शेतकरी अधिकाधिक उत्पादन येण्यासाठी सर्रासपणे रासायनिक खतांचा वापर करू लागला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा पोत खराब होत आहे. सकस अन्न सेंद्रिय शेतीतून मिळते. यामुळे सेंद्रिय धान्य, फळांना मागणी वाढली आहे. मात्र, अनुदान प्राप्त होण्यासाठी लागणारा वेळ, सेंद्रिय धान्यास मिळणारा अल्प भाव यांमुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे. 

जळगाव ः शेतकरी अधिकाधिक उत्पादन येण्यासाठी सर्रासपणे रासायनिक खतांचा वापर करू लागला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा पोत खराब होत आहे. सकस अन्न सेंद्रिय शेतीतून मिळते. यामुळे सेंद्रिय धान्य, फळांना मागणी वाढली आहे. मात्र, अनुदान प्राप्त होण्यासाठी लागणारा वेळ, सेंद्रिय धान्यास मिळणारा अल्प भाव यांमुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे. 

धकाधकीच्या जीवनात कमी श्रमात अधिक मोबदला मिळविण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील असतात. शेतकरीही त्यात मागे नाहीत. शासन हमीभाव अधिक देत नसल्याने रासायनिक खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत. याचा परिणाम मात्र धान्यावर होत आहे. नैसर्गिक पद्धतीने अर्थात सेंद्रिय खतांअभावी सकस असे धान्य तयार होत नाही. सकस धान्याअभावी व्यक्‍तीची शारीरिक शक्‍ती दिवसेंदिवस क्षीण होताना दिसते. 

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय मालाला शासन हमीभाव देत नाही. अनुदानासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. सेंद्रिय पद्धतीने शेतीला अधिक खर्च येतो. यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत नाहीत. वळले तर फार कमी संख्येने. 

बाजारपेठेत अनेक दुकानांत सेंद्रिय खते उपलब्ध असतात. मात्र, त्यांची विक्री अत्यल्प होते. शेणखत, गांडूळखत, खतांचे लिक्विड, निंबोली अर्क आदी प्रकारची सेंद्रिय खते, फवारणी औषधी उपलब्ध आहेत. शेतकरी किंवा परसबाग लावणारेच सेंद्रिय खते घेतात. काही शेतकरी घरीच सेंद्रिय खते तयार करतात. सेंद्रिय पद्धतीने अधिक शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला जादा भाव दिला, तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. 

वाढती ग्राहकसंख्या 
रासायनिक खतांच्या दुष्परिणामांची जाणीव आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. यामुळे ग्राहक आता सेंद्रिय धान्य, फळांची मागणी करू लागले आहेत. ही संख्या दोन वर्षांत वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात सेंद्रिय धान्याची आवक होत नसल्याचे चित्र आहे. 
 
सेंद्रिय धान्यासह फळांना अधिकाधिक मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामानाने सेंद्रिय मालाची आवक बाजारपेठेत होत नाही. सेंद्रिय धान्यास जादा भाव देण्यास ग्राहक तयार असतात. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. 

- सुनील पाटील, संचालक ऑरगॅनिक शॉपी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sendriy dhanya faltiliser