"पाडळसरे', "नार-पार'चे काम मोदी सरकारच्या काळात अपूर्णच : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल येथे तुमच्यासमोर येणार नाहीत,'' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एरंडोल येथील जाहीर सभेत लगावला. 

जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल येथे तुमच्यासमोर येणार नाहीत,'' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एरंडोल येथील जाहीर सभेत लगावला. 
यावेळी त्यांनी स्थानिक मुद्यांवरही लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाच्या कामाचा उल्लेख केला. ते म्हणाले, की गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांबाबत लोकांना आश्‍वासने दिली. मात्र, पाच वर्षांत त्यांनी केवळ गप्पाच मारल्या. देशातच कोठेही विकास केला नाही. अगदी जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे. त्यामुळे मोदी या ठिकाणी पुन्हा सभेस आल्यास तुम्ही प्रश्‍न विचाराल. त्यामुळे ते तुमच्यासमोर आता येणारच नाहीत. 

जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविणार 
जिल्ह्याच्या प्रश्‍नांबाबत श्री. पवार म्हणाले, की या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तनाची संधी आहे. ती सोडू नका. गुलाबराव देवकर यांना निवडून देऊन आमच्यासोबत दिल्लीला संसदेत काम करण्यासाठी पाठवा. जिल्ह्यातील विकासाचे राहिलेले सर्व प्रश्‍न सोडविण्याची मी हमी देतो. 

विकासाचे प्रश्‍न सोडविणार : देवकर 
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर म्हणाले, की आपण सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे आहोत. पालकमंत्री असताना आपण या जिल्ह्याच्या विकासासाठीच काम केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केले. पद्‌मालय, वरखेडे- लोंढे या धरणाची उंची वाढविण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले; परंतु या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यातील सिंचनाची सर्व कामे बंदच आहेत. शेतकऱ्यांना तर जीवन जगणेही कठीण झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात आम्ही विकास केला होता. कोणतीही कामे केली नसल्यामुळे या सरकारला लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाही. आतापर्यंत त्यांना चार उमेदवार बदलावे लागले आहेत. जनतेचा आपल्यावर विश्‍वास असून, तेच आपल्याला निश्‍चित निवडून देतील, याचा विश्‍वास आहे. आपणही मतदारसंघाच्या विकासासाठी जोमाने प्रयत्न करणार आहोत. 

"चंपा'ला कोल्हापूरला पाठवू : आमदार पाटील 
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर सडकून टीका केली. चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख त्यांनी "चंपा' असा करून ते म्हणाले, की त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री केले; परंतु त्यांनी काही कामे केली नाहीत. त्यांना आम्ही आता तेल लावून पुन्हा कोल्हापूरला परत पाठविणार आहोत. जलसंपदामंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले, की गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. मात्र, जनता त्यांना निश्‍चित धडा शिकवेन. 

भाजपची दयनीय अवस्था : पाटील 
अनिल भाईदास पाटील म्हणाले, की भाजपला उमेदवार बदलावे लागत आहेत, अशी दयनीय अवस्था आपण आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती. आता बदलेला उमेदवारही "डाकू'च आहे, अशी सणसणीत टीकाही त्यांनी केली. 

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, रिपाइं कवाडे गटाचे जगन सोनवणे, मुकुंद सपकाळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, राष्टवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, ऍड. वसंतराव मोरे, कॉंग्रेसच्या ललिता पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक रंगनाथ काळे उपस्थित होते. 

मोबाईलच्या बॅटरीने स्वागत! 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर आल्यानंतर सभेस उपस्थित जनसमुदायाने जागेवरच उठून त्यांना सन्मान दिला, तसेच नागरिकांनी मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडाने त्यांचे स्वागत केले. त्यावेळी एकच जल्लोष झाला. 

"चौकीदार चोर है'च्या घोषणा! 
शरद पवार यांनी "राफेल'चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मोदींवर टीका करून "हा कोण चौकीदार आहे,' असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी उपस्थितांमधून "चौकीदार चोर है' अशा घोषणा देण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sharad pawar sabha nar par praklp