पुलाचा राजूमामांपेक्षा माझ्या "ग्रामीण'लाच अधिक लाभ : मंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल, असा विश्‍वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल, असा विश्‍वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

"जळगाव ग्रामीण'ला लाभ : पाटील 
माझ्या ग्रामीण मतदारसंघातील सर्व गावांची वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे शहरातील नागरिकांसोबत ग्रामीणमधील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे आमच्यात "प्यार का वादा' फिफ्टी फिफ्टी असा आहे. शिवाजीनगर पूल ते चोपडा गोरगावलेपर्यंतच्या रस्त्यासाठी 112 कोटी रुपये मंजूर असल्याने चांगला रस्ता होणार आहे. 

चांगल्या कामासाठी थोडा त्रास : आमदार भोळे 
कार्यक्रमाप्रसंगी आमदार भोळे आभार व्यक्त करताना म्हणाले, की शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या निधीसाठी सर्वांचा पाठपुरावा कामी आला. या पुलामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरातील 45 हजार नागरिकांचा याचा लाभ होणार आहे. पुलाच्या कामाला 18 महिने लागतील त्यामुळे थोडा त्रास सहन नागरिकांना करावा लागणार आहे; परंतु, चांगल्या कामासाठी थोडा त्रास नागरिकांनी सहन करावा, असे आमदारांनी मत व्यक्त केले. 
 
मंत्री, आयुक्तांची गाडी ट्रॅफीकमध्ये अडकली 

शिवाजीनगर पुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास येताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे काही वेळासाठी अडकली होती. पुलावर क्रॉस बार लावलेल्या ठिकाणी दोन वाहने अडकल्याने ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 
 
भाजपचे पदाधिकारी अनुपस्थित 
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरातही भाजपचे गट पडले आहेत. पक्षात आलेले आणि जुने निष्ठावंत अशी स्पर्धा सुरू असते. त्यातूनच या कार्यक्रमासाठीच्या पत्रिकेत अनेक पदाधिकाऱ्यांची नावे नव्हती. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivaji nagar brige gulabrao patil