esakal | शिवाजीनगर रेल्वेपुलाच्या डिझाईनवरून काम रखडले 
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीनगर रेल्वेपुलाच्या डिझाईनवरून काम रखडले 

शिवाजीनगर रेल्वेपुलाच्या डिझाईनवरून काम रखडले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होऊन फेब्रुवारी महिन्यापासून जुना पूल तोडण्याचे कामाला सुरवात झाली. मध्यंतरी वीजखांब बदलण्याचा वाद होता. आता पुलाचे डिझाईन करण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मक्‍तेदार यांच्यात वाद सुरू असून काम ठप्प आहे. 

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल ब्रिटिशकालीन असून कालबाह्य झाल्यामुळे तो नव्याने उभारण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ब्रिटिश सरकारसह रेल्वे प्रशासनाने जळगाव महापालिकेस याबाबत अनेकदा सूचितही केले होते. मात्र, जानेवारी 2016 मध्ये नितीन गडकरींनी जळगावातील सभेत या पुलाच्या कामास मान्यता देण्याची घोषणा केली, आणि त्यास पुन्हा चालना मिळून जानेवारी महिन्यात या पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या 25 कोटींच्या निविदा प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्‍चर व उस्मानाबाद येथील तेजस सुपर स्ट्रक्‍चर यांनी संयुक्तपणे कामाला सुरवात करून जुना पूल तोडण्यात आला. नवीन पुलाचे काम लवकर सुरू होईल अशी अपेक्षा जळगावकरांमध्ये निर्माण झाली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच वीजखांब स्थलांतरित करण्यावरून मनपा आणि मक्‍तेदार यांच्यात वाद निर्माण होऊन काम थांबले. हा वाद मिटतो न मिटतो तोच आता पुन्हा काम थांबले आहे. तीन महिन्यांपासून नवीन पुलाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. 

डिझाईन तयार करण्याचा वाद 
काम का थांबले याची माहिती घेतली असता डिझाईन तयार करण्यावरून वाद निर्माण झाल्याने हे काम थांबल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदारांत निविदेत डिझाईनचे काम कोण करणार? हे स्पष्ट नमूद केलेले नव्हते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक कार्यालयात डिझाईन विभागात अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे हे काम केले जात नसल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे हे काम रखडले. अखेर मक्तेदाराने या पुलाची डिझाईन तयार केले असल्याचे सांगितले. ते आता मंजुरीसाठी नाशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून सोमवारी (ता. 26) त्यास अंतिम मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

नवीन पद्धतीने डिझाईन 
आधी तयार केलेल्या डिझाईनमध्ये शिवाजी चौकात व जिल्हा परिषद जवळील पत्र्या हनुमान मंदिर चौकामध्ये पुलाचा पिलर येत असल्याने अपघाताची शक्‍यता असल्याची अडचण निर्माण होती. त्यामुळे पुन्हा पुलाची स्लॅम, पिलरची पुन्हा नवीन पद्धतीने डिझाईन तयार करण्याचे काम करावे लागल्याने एक महिन्याचा 
कालावधी अधिक लागला असल्याची माहिती मिळाली आहे. 

सप्टेंबरमध्ये कामाला सुरवात 
पुलाचे डिझाईन सोमवारपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मक्तेदारांकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरवात होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर येत आहे. पुलाच्या कामाला जिल्हा परिषदेकडून आधी सुरवात होणार आहे. 

loading image
go to top