Republic day 2020 : जळगावात शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर जळगाव जिल्ह्याच्या मुख्यालयी दर दिवशी सातशे भोजन थाळींची मर्यादा आहे. शहरात आठ ठिकाणी नऊ केंद्र सुरु करण्यात येणार आहे

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात आजपासून शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. याप्रसंगी शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर जळगाव जिल्ह्याच्या मुख्यालयी दर दिवशी सातशे भोजन थाळींची मर्यादा आहे. शहरात आठ ठिकाणी नऊ केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी येणारे शेतकरी, शेतमजूर, रुग्ण, गरीब नागरिकांना अल्पदरात भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून राज्य शासनाने शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कमी पैशात दर्जेदार भोजनाची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. शिवभोजन चालकास ग्राहकांकडून 10 रुपये, तर शासनाकडून प्रति थाळी 40 रुपयांचे अनुदान देण्यात येईल. आगामी काळात मागणीनुसार थाळींची संख्या वाढविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. 

दुपारी दोन तास राहील केंद्र सुरू
शहरातील ही शिवभोजन केंद्रे दुपारी 12 ते 2 या कालावधीत सुरू राहतील. या भोजनात दोन चपाती, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरणाचा समावेश आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivbhojan center open gulabrao patil