Loksabha 2019 : शिवसेनेकडून अपेक्षा अन्‌ दुसरीकडून आरोप हे अमान्य! : गुलाबराव वाघ

Gulabrao wagh
Gulabrao wagh

जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद' कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'तर्फे गोलाणी संकुलातील शहर कार्यालयात श्री. वाघ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सेनेच्या रणनीतीसह भाजपशी संबंध व निवडणुकीबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली. 

प्रश्‍न : राज्यात युती झाली आहे, आता पुढची रणनीती काय? 
उत्तर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत राज्यात युतीची घोषणा करण्यात आली आहे. आता दोन्ही नेते संयुक्तपणे राज्यात मेळावे घेणार आहेत. अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागाचा नाशिक येथे मेळावा घेण्यात येईल, त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. 

प्रश्‍न : जळगाव लोकसभेसंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? 
उत्तर : शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जास्तीत-जास्त जागा युतीच्या निवडून आणण्याची घोषणा केली आहे, त्यानुसार आम्ही कामाला लागणार आहोत. 

प्रश्‍न : भाजपचे काम करणार नाही, असा सेनेने धरणगावात ठराव केला? 
उत्तर : होय, मी सुद्धा ते वर्तमानपत्रात वाचले. त्या बैठकीस आपण उशिरा पोहोचलो, शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात ही बैठक होती. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांनी एका ले-आउट संदर्भात सात लाख रुपये घेतले, असा आरोप केला आहे. ज्यांच्यावर आरोप केला ते सलीम पटेल आजारी आहेत, घरातच अंथरुणावर आहेत, त्यांना बोलताही येत नाही. त्यांच्यावर केलेला आरोप शिवसैनिकांना सहन झालेला नाही. एकीकडे भाजप शिवसेनेकडून लोकसभेत कामाची अपेक्षा ठेवत आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असा आरोप भाजप करीत असेल तर ते कसे चालेल. तरीही ठराव काहीही झाला असला तरी आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार युतीचे काम करणारच आहोत. 

प्रश्‍न : जळगाव लोकसभेत सेनेकडे उमेदवार आहे; मग तुम्ही मागणी का करीत नाही? 
उत्तर : निश्‍चितच! आमची मागणी आजही ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशीच आहे. त्याबाबत आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत. जळगाव लोकसभेतील दोन विधानसभा शिवसेनेकडे आहेत. पारोळ्याची एक जागा कमी पडली, जळगाव विधानसभा मतदारसंघातही आमदार सुरेशदादा जैन प्रचारासाठी नसल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला; अन्यथा ते निवडून आले असते. मात्र आजही शहरात शिवसेनेचे प्राबल्य आहे. तीन पंचायत समितीचे सभापती आहेत, तीन नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. या ठिकाणी आमची मोठी ताकद आहे. भाजपचे जळगाव व चाळीसगाव येथे आमदार असले तरी इतर ठिकाणी फारशी ताकद नाही. मात्र युतीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला जातो. त्यानुसार भाजपकडे ही जागा आहे. त्यामुळे आमची मागणी आजही कायम आहे. 

प्रश्‍न : तुम्ही जागा मिळाली तर लढविणार काय? 
उत्तर : होय, शिवसेना तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघासाठी आमची तयारी सुरू आहे. आम्ही सर्व तालुक्‍यातील बूथप्रमुखांचे मेळावेही घेतले आहेत. शिवसेनाही बाराही महिने तयार असते. "पावसाळा आला म्हणजे छत्र्या उघडायच्या' असे इतर पक्षाप्रमाणे आमचे नसते. त्यामुळे पक्षप्रमुखांनी ही जागा लढविण्याचे आदेश दिले तर आम्ही लढवून यश मिळवू. 

प्रश्‍न : ही जागा तुम्हाला मिळेल, असे वाटते काय? 
उत्तर : होय, कारण भाजपनेही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत, पालघर, जळगाव आणि भिवंडी मतदार संघाबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस ही जागा आम्हाला मिळू शकते. 

प्रश्‍न : विधानसभेत जळगावला भाजपचा आमदार आहे, मात्र जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे त्याचे काय? 
उत्तर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाची चर्चा करताना लोकसभेप्रमाणे विधानभेचीही जागा वाटप केली आहे; परंतु आता प्रश्‍न नंतरचा आहे. त्यावेळी चर्चा केल्यानंतर आम्ही अंर्तगत जागा वाटपात जळगाव विधानसभेची जागा मागू शकतो आणि ती आम्हाला मिळू शकते. 

प्रश्‍न : शिवसेनेची जागा जळगावला मिळाली नाही, तरी तुम्ही भाजपला सहकार्य करणार? 
उत्तर : होय, करणारच! शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आम्ही पाळणार आहोत. ही लोकसभा निवडणूक आहे, मोंदीचे हात बळकट करण्यासाठी एकेक जागा महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही युतीचा उमेदवार निवडून आणणार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com