बताओ, जलगॉंव भाजपवालो आप किसके संग...? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भाजप- खानदेश विकास आघाडीच्या युतीचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात येत असले, तरी भाजपच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना मात्र हे समीकरण रुचलेले नाही. ही नाराजी पक्षनेत्यांसोबतच "सोशल मीडिया'वरही व्हायरल होत असून, "व्हॉटस्‌ऍप'वर मोदींच्या छायाचित्रासह "बताओ जलगॉंव भाजपवालो आप किसके संग...,' असा प्रश्‍न "नेटिझन्स' विचारत आहेत. 

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भाजप- खानदेश विकास आघाडीच्या युतीचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात येत असले, तरी भाजपच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना मात्र हे समीकरण रुचलेले नाही. ही नाराजी पक्षनेत्यांसोबतच "सोशल मीडिया'वरही व्हायरल होत असून, "व्हॉटस्‌ऍप'वर मोदींच्या छायाचित्रासह "बताओ जलगॉंव भाजपवालो आप किसके संग...,' असा प्रश्‍न "नेटिझन्स' विचारत आहेत. 
शहरात तीन- चार दशकांपासून सुरेशदादा जैन यांच्या गटाचे अपवाद वगळता निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र, दोन- अडीच दशकांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जैन यांच्याविरोधात शहरात वातावरण तापवायला सुरवात केली. पालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची प्रकरणे जशी समोर आली, त्या प्रकरणांवरून खडसेंनी शहरात जाहीर सभांमधून व विधानसभेतही घणाघाती टीका करीत सातत्याने हे विषय लावून धरले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीपर्यंत खडसेंनी या गैरव्यवहार प्रकरणांचा पिच्छा पुरविला. त्यातून जैन यांच्यासह अनेकांना कारागृहातही जावे लागले. 

भाजपच्या भूमिकेने नाराजी 
महापालिकेतील ज्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत भाजपने शहरात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, त्याच गटाशी जाऊन हातमिळवणी करण्यावरून पक्षात तीव्र नाराजी आहे. जैन आणि गिरीश महाजन यांनी भाजप- खानदेश विकास आघाडी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत दिले आहेत आणि तेव्हापासून खडसे समर्थकांसह जुने-जाणते भाजप कार्यकर्ते या युतीच्या विरोधात भूमिका घेत नेत्यांसमोर घोषणाबाजी करू लागले आहेत. ज्या प्रवृत्तींविरोधात अनेक वर्षे संघर्ष केला, त्यांच्यासोबत युती नको, अशी भूमिका खुद्द खडसेंनीही जाहीर केली आहे. 

मोदींचा दाखला देत प्रश्‍न 
भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते या संभाव्य युतीवरून आपली नाराजी वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त करीत आहेत. "सोशल मीडिया'वरून अनेक "पोस्ट' त्यासंबंधी फिरत असून, अलीकडेच मोदींचा दाखला देत शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना प्रश्‍न विचारला जात आहे. 
"प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीने 
पुरे देश में छेडी है 
भ्रष्टाचार के खिलाफ जंग 
बताओ, जलगॉंव भाजपवालो 
आप हो किसके संग...?' 
सध्या या प्रश्‍नाची "पोस्ट' विविध ग्रुपमधून फिरत असून, जुने कार्यकर्ते तिला "लाइक' करीत आहेत, तर काहींनी त्यावर वेगवेगळी मतेही मांडली आहेत. एकूणच, संभाव्य भाजप- खानदेश विकास आघाडी युती जागावाटप निश्‍चित होण्यापूर्वीच टीकेसह चर्चेचा विषय बनली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon social midea election