सोशल मीडियातून मोफत स्पोकन इंग्लिशचे धडे 

अमोल महाजन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये यासाठी मी त्यांना स्पोकन इंग्लिश द्वारे इंग्रजी सोपी करून शिकवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे घाबरलेल्या नागरिकांसाठीही दर रविवारी युट्युबवर प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड करून त्यांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्याचे कार्यही सुरू आहे. 
- सय्यद अल्ताफ अली, डायट ट्रेनर जळगाव, 

जळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या संपूर्ण भारतात लॉकडाउन करण्यात आल्याने लोकांना घराच्या बाहेर निघणे मुश्‍कील झाले आहे. 
लॉकडाउनचा हा वेळ सदुपयोग व्हावा यासाठी यूट्यूब आणि व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाचा उपयोग करून मोफत स्पोकन इंग्लिश व प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड करून शिक्षणात मोलाची भर टाकण्याचे कार्य जळगाव डायटचे ट्रेनर अल्ताफ अली हे करीत आहेत. आतापर्यंत दहा व्हॉट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 1700 जण याचा लाभ घेत आहेत. 
विद्यार्थ्यांसह सर्वच स्तरातील नागरिकांना सोशल मीडियाही नकोसे वाटू लागले आहे. परंतु, या भयानक परिस्थितीतही लोकांनी घरी बसून आपला वेळ सत्कर्मी लावावा यासाठी अल्ताफ अली यांनी स्पोकन इंग्लिश व प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे अपलोड करून लॉकडाउनमध्येही लोकांचा वेळ वाया न जाता यावेळेचा सदुपयोग काहीतरी शिकण्यासाठी गेला असल्याची भावनादेखील व्यक्तींच्या मनात निर्माण व्हावी यासाठी त्यांनी मोफत स्पोकन इंग्लिशचे धडे देण्यास सुरवात केली. 

इंग्रजीची भीती पळविण्याचे उद्दिष्ट 
लॉकडाऊनच्या काळात शिक्षक विद्यार्थी पालक आणि इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी घरी बसल्या बसल्या स्पोकन इंग्लिश द्वारे इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने अवगत करावी आणि प्रेरणादायी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भीतीही दूर होण्याचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत इंग्रजी भाषा सोपी करून शिकण्याची विद्यार्थ्यांसह सर्वच स्तरातील लोकांना नामी संधी आहे. 

व्हॉट्‌सअपच्या माध्यमाचा वापर 
इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांसह प्रत्येकाला सोप्या पद्धतीने अवगत व्हावी यासाठी अल्ताफ अली यांनी दहा व्हॉट्‌सअप ग्रुपच्या तयार करून त्याद्वारे जवळपास 1700 जणांना जोडून त्यांना दररोज एक स्पोकन इंग्लिशचा एक व्हिडिओ तयार करून ग्रुपवर शेअर केला जातो. यामुळे सोशल मीडियाचा वापर शिक्षणासाठीही करता येत असल्याची प्रचिती समोर येते. 

युट्युबवर प्रेरणादायी व्हिडिओ 
"युनिव्हर्सल लर्निंग' या नावाने एक यूट्यूब चॅनल तयार करून त्यामाध्यमातून अली दर रविवारी एक प्रेरणादायी व्हिडिओ तयार करून कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळत आहे. लोकांमध्ये जनजागृती होऊन यातून विद्यार्थ्यांनाही काही शिकावयास मिळत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon spoken english class through social media