कला, क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ प्रा. पु.ग. अभ्यंकरांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

बालपणापासून खेळाची आवड असलेल्या पुरुषोत्तम गजानन (पु.ग.) अभ्यंकर यांनी नंतर खो- खो क्रीडा प्रकारात नैपुण्य सिद्ध केले. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही वर्षे सेवा केली. नंतर ते नामांकित मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची प्रतिमा.

जळगाव : जिल्ह्याच्या कला व क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. पु.ग. अभ्यंकर (वय 78) यांचे आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. खो-खो या क्रीडा प्रकारात पारंगत असलेल्या प्रा. अभ्यंकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य क्रीडा व कला क्षेत्रासाठी वाहिले. 
बालपणापासून खेळाची आवड असलेल्या पुरुषोत्तम गजानन (पु.ग.) अभ्यंकर यांनी नंतर खो- खो क्रीडा प्रकारात नैपुण्य सिद्ध केले. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही वर्षे सेवा केली. नंतर ते नामांकित मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची प्रतिमा. अध्यापन सांभाळताना त्यांनी खो-खो या त्यांच्या आवडत्या खेळाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या मार्गदर्शनात जळगाव शहर व जिल्ह्यात विविध क्रीडा प्रकारात असंख्य खेळाडू तयार झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे ते पहिले संचालक होते. 

कला क्षेत्रातही योगदान 
जळगावच्या कला क्षेत्राच्या विकासातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्याच पुढाकाराने त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ अभ्यंकर गीतगायन स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. राज्यात लौकिक मिळविलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे ते विद्यमान अध्यक्ष होते. प्रा. अभ्यंकर यांनी या प्रतिष्ठानची धुरा अत्यंत समर्पितपणे व शिस्तीने वाहिली. प्रतिष्ठानला व बालगंधर्व संगीत महोत्सवाला त्यांच्याच कार्यकाळात वेगळी उंची प्राप्त झाली. आज सकाळी मू.जे. महाविद्यालय परिसरातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sport and calture field man profecer abhyankar death