संचारबंदी आदेशाला "खो'...पोलिसांचा दंडुका "म्यान'; "उठबशां'वर जोर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

"कोरोना'वर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम 24 तास राज्य शासनासह अन्य अत्यावश्‍यक सेवा देणारे विभाग करीत आहे. परंतु याचे अनेक नागरिकांना अजूनही गांभीर्य नसून ते रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांकडून मात्र कारवाई थंडावलेली दिसून आली.

जळगाव ः "कोरोना' विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना दंडुक्‍याचा "प्रसाद' देत वचक निर्माण केला होता. परंतु पोलिस कारवाई आज काहीअंशी थंडावलेली दिसून आली. रस्त्यावर फिरणाऱ्यांना उठबशा अथवा समज देत सोडून देण्यात येत होते. परिणामी, रस्त्यावर पुन्हा वाहनांची वर्दळ वाढल्याने नागरिकांनीच संचारबंदीच्या आदेशाला "खो' दिल्याचे चित्र होते. 

देशात "कोरोना' विषाणूचा प्रसार थांबवावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. "कोरोना'वर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम 24 तास राज्य शासनासह अन्य अत्यावश्‍यक सेवा देणारे विभाग करीत आहे. परंतु याचे अनेक नागरिकांना अजूनही गांभीर्य नसून ते रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांकडून मात्र कारवाई थंडावलेली दिसून आली. 

 
पोलिसांकडून लाठी वापर कमी 
पोलिसांकडून संचारबंदीच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य चौकात, कॉलन्या, वसाहती तसेच दाट वस्तीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडू नये, यासाठी बंदोबस्त केला जात आहे. यात विनाकामाने फिरणाऱ्या नागरिकांना घरी बसण्यासाठी लाठीचा प्रसाद देऊन धाक दाखविला जात आहे. परंतु आज 
जळगाव शहरात पोलिसांकडून लाठीचा कमी वापर केल्याचे दिसून आले. तर अनावश्‍यक कामाने फिरणारे आढळून आलेल्यांना उठबशा घालून सोडून देण्याचे चित्र दिसून आले. 

 
पुन्हा वाहनांची वर्दळ 

दोन-तीन दिवसांपासून पोलिसांनी कडक कारवाई केल्याने तसेच अत्यावश्‍यक सेवांना पेट्रोल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. मात्र, आज पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक नागरिकांची वाहने फिरताना दिसत होती. 

गस्त झाली कमी 
शहरातील अनेक भागात पोलिसांची गस्त दाट वस्तीत वाढविण्यात आली होती. परंतु, ज्या चौकांमध्ये टवाळखोर उभे राहतात तेथे पोलिसांची गस्त कमी झालेली आहे. यात मेहरुण, तांबापुरा, वाघनगर थांबा, हरिविठ्ठलनगर, शनिपेठ, शाहूनगर, पिंप्राळा आदी परिसर आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Stop" the communication order "Police stop Action