स्वस्त धान्य दुकानदारांना आता वेळेचे बंधन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळही एप्रिलसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे; तर मे- जूनसाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहित अन्नधान्य आणि मोफत तांदूळ त्याच महिन्यात उपलब्ध होणार आहे.

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांत धान्यवाटप केले जात आहे. मात्र, बहुतांश दुकानांमध्ये नागरिकांनी "सोशल डिस्टन्सिंग'चे नियम धाब्यावर बसविले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या दुकानदारांनी दुकाने सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत उघडी ठेवून धान्याचे वितरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. 
एप्रिलचे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहित स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात आले आहे. याच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळही एप्रिलसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे; तर मे- जूनसाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहित अन्नधान्य आणि मोफत तांदूळ त्याच महिन्यात उपलब्ध होणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थी यादीत नाव नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता मे- जूनमध्ये आठ रुपये प्रतिकिलो दराने गहू, प्रतिसदस्य तीन किलो आणि बारा रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, प्रतिसदस्य दोन किलो, असे एकूण पाच किलो धान्य प्रतिसदस्यास मिळणार आहे. हे धान्य मेच्या पहिल्या आठवड्यात संबंधित स्वस्त धान्य दुकानांतून उपलब्ध होणार आहे, तसेच जूनमध्येही याचप्रमाणे अन्नधान्य मिळणार आहे. 
 
"सोशल डिस्टन्सिंग'चे नियम पाळा 
पात्र लाभार्थ्यांना धान्यवाटपासाठी सर्व स्वस्त धान्य दुकाने दिलेल्या वेळेत उघडी राहतील. लाभार्थ्यांनी आपापले धान्य घ्यायला जाताना गर्दी न करता मर्यादित अंतर राखूनच "सोशल डिस्टन्सिंग'चे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे. 
 
आता त्या- त्या महिन्यातच मिळणार धान्य! 
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच "एपीएल' केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे मिळणार होते; परंतु आता नवीन निर्देशानुसार या तिन्ही महिन्यांचे धान्य त्या- त्या महिन्यातच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon swast dhanya shop time limit collector order