कोरोनाचा उद्रेक रोखण्यात ठाकरे सरकार सप्शेल अपयशी : माजीमंत्री महाजन  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

शासन व प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव आहे. यामुळे राज्यातील कोरोनोची स्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती.

जळगाव :  देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वाधिक भीषण स्थिती महाराष्ट्रात झाली असून देशाच्या 35 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यात ठाकरे सरकार सप्शेल अपयशी ठरल्याची टीका करत भाजपने आता राज्यातील आघाडी सरकारला घेरणे सुरु केले आहे. ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ घरी बसून कामकाज करत असून सरकार व प्रशासनात समन्वय नाही. अशीच स्थिती राहिली तर आगामी काळात राज्यातील कोरोनोचा आकडा 90 हजारांच्या घरात पोचेल. शासनाने जागे व्हावे, कडक उपाय करावेत यासाठी भाजपतर्फे "महाराष्ट्र बचाव' आंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती माजीमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली. 

महाजनांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजपच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात आज निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

केंद्राच्या निधीचा विनियोग नाहीच 
श्री.महाजन यांनी सांगितले, की राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासन त्यासाठी विविध पॅकेजची घोषणा करीत आहे. मात्र शासन त्याचा उपयोग योग्य रितीने करीत नसल्याने कोरोनाला रोखण्यात राज्य शासन संपूर्ण अपयशी ठरले आहे. कोरोनोच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर, नर्स, आरोग्य सेवकांना पीपीटी किट मिळत नाही. इतर आवश्‍यक साहित्य मिळत नाही. पोलिसांना संरक्षणासाठी साहित्य मिळत नसल्याने राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्राने नागरिकांना रेशनिंगवरून मोफत धान्याची घोषणा केली. मात्र ते धान्य वाटपातही गोंधळाची स्थिती आहे. दोन महिन्यांपासून राज्यातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो आहे. 

शेतकऱ्यांचेही हाल 
सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू अशी घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देवू शकले नाही. शेतकरी चिंताग्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे. हमीभावात 1200 ते 1300 चा फरक आहे. 
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ घरात बसून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे काम चालवितात. बाहेर पडत नाही. अधिकारी, आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, चांगल्या कामाचे कौतुकही करीत नाही. शासन व प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव आहे. यामुळे राज्यातील कोरोनोची स्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती. अपयशी ठरलेल्या शासनाचा भाजपतर्फे आम्ही निषेध करतो. राज्यभर भाजपतर्फे आंदोलन सुरू करीत आहोत. 

नाथाभाऊंचा विषय टाळला.. 
माजीमंत्री एकनाथराव खडसेंच्या विधान परिषदेवरील उमेदवारीसह त्यांच्यात व प्रदेशाध्यक्षांमधील कथित वादाबाबत विचारले असता सध्या तो विषय नाही, कोरोनाचा विषय आहे. त्याविषयी विचारा, असे सांगत त्यांनी श्री. खडसेंवर बोलणे टाळले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. गुरूमुख जगवानी, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Thackeray government fails to stop corona outbreak, mla girishe mhajan