"थ्री स्टार'चे मानांकन सर्वेक्षणातून की कागदपत्रांतून? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यातच जानेवारीत राज्य शासनाचे पथक आले होते. त्यामुळे पथकाने कशाचे सर्वेक्षण केले? कोणते निकष तपासले, की कागदपत्रच तपासले.

जळगाव ः "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत "कचरामुक्त शहर' (गार्बेज फ्री सिटी)मध्ये जळगाव महापालिकेने सहभाग घेतला. जानेवारीत राज्य शासनाच्या समितीने सर्वेक्षण केल्याच्या आधारावर जळगाव महापालिका "थ्री स्टार' मानांकनासाठी पात्र ठरली; परंतु त्यावेळी महापालिका व सफाई मक्तेदार यांच्यात जोरदार वाद सुरू होता, तसेच शहरातील सर्वच ठिकाणांवरून अस्वच्छतेच्या तक्रारी तसेच साचलेला कचरा दिसत असताना "थ्री स्टार' महापालिकेला कसे मिळाले, असा प्रश्‍नही सर्वसामान्यांसमोर आता ठाकला आहे. 

शहरात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर होता. नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला सफाई मक्ता महापालिकेने पाच वर्षांसाठी 75 कोटींना दिला होता; परंतु काम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून ते मक्तेदाराचे काम बंद केल्याच्या दिवसापर्यंत अस्वच्छतेचा व कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून ओरड होत होती, तसेच महापालिकेच्या स्थायी समिती ते महासभांमध्ये अनेकदा मक्तेदार व शहरातील अस्वच्छतेवरून सत्ताधारी, विरोधक तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यात जानेवारीत "कचरामुक्त शहर' अभियानाच्या सर्वेक्षणाचे पथक आले होते, त्यावेळीही शहरात अशीच परिस्थिती होती. 

सर्वेक्षण झाले कशाचे? 
शहरातील दैनंदिन स्वच्छता, तसेच कचरा संकलनाचा मक्ता वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला होता; परंतु पहिल्या दिवसापासून मक्तेदाराच्या तक्रारी होत्या, तसेच जानेवारीत मक्‍तेदार- महापालिका प्रशासनात वाद सुरू होता. अनेक वेळा मक्तेदाराने कामही बंद केले होते. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यातच जानेवारीत राज्य शासनाचे पथक आले होते. त्यामुळे पथकाने कशाचे सर्वेक्षण केले? कोणते निकष तपासले, की कागदपत्रच तपासले? असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांत वाढ 
"कचरामुक्त शहर'मध्ये महापालिकेला "थ्री स्टार'चे मानांकन मिळाल्याने "स्वच्छ सर्वेक्षण'च्या गुणांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाची जबाबदारी वाढणार असून, "स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेच्या निकालानंतर शहरातील साफसफाईच्या कामांची खरी परिस्थिती समोर येणार आहे; परंतु "लॉकडाउन'मध्ये शहरातून 30 टक्के कचरा कमी झाला आहे. त्यामुळे आता जरी शहर स्वच्छता दिसत असले, तरी "लॉकडाउन' संपल्यानंतर सर्व व्यवसाय, दुकाने, बाजार सुरळीत सुरू झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने शहर स्वच्छ दिसत आहे, तसे ठेवण्याची मोठी जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. 

जळगाव शहरात सफाई मक्तेदारांच्या कामावरून सर्वत्र ओरड होत होती. त्यात पथक येऊन सर्वेक्षण करून जाते आणि "कचरामुक्त शहर' अभियानात महापालिकेला "थ्री स्टार' कसे काय मिळतात, हे सर्व संशयास्पद आहे. त्यात कागदी घोडे व समितीला "मॅनेज' करून हा प्रकार केलेला असल्याचे दिसून येत आहे. 

- सुनील महाजन, विरोधी पक्षनेता, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon three star garbege free city eshu