परीक्षेसंदर्भात विद्यापीठाला राज्य समितीकडून अहवालाची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

काही दिवसांपूर्वी राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी राज्यातील विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून चर्चा केली होती.

जळगाव : कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असल्याने लॉकडाउनमुळे विद्यापीठ पूर्णपणे बंद आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने राज्यपालांना परीक्षांसंदर्भात अहवाल सादर केला आहे. मात्र, राज्य समितीच्या अहवालाची विद्यापीठाला अद्याप प्रतीक्षा आहे. 
काही दिवसांपूर्वी राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी राज्यातील विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून चर्चा केली होती. यावर चर्चा होऊन सहा जणांची तज्ज्ञ समिती स्थापन करून लॉकडाउन संपल्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षा कधी, कशा व कोणत्या वेळी घ्याव्यात, याबाबत या समितीने शासनास अहवाल सादर करावयास सांगितले आले होते. परंतु, याबाबत अद्याप या समितीने राज्यपालांना अहवाल सादर केलेला नाही. 

युजीसीचा अहवाल प्राप्त 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात याव्यात, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन केली. या समितीने आपला अहवाल आयोगाला सादर केला आहे. विद्यापीठांनी त्यांच्या प्रचलित गुणांकन पद्धतीने ऑनलाइन अथवा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत परीक्षा घेऊन 14 ऑगस्टला निकाल जाहीर करावा, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्याची एक प्रत सर्व राज्यपालांना (कुलपती) पाठविण्यात आली आहे. आता राज्यपाल त्यांच्या राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून निर्णय घेतील. 

दोन- तीन दिवसात निर्णयाची शक्‍यता 
परीक्षा कधी व कशा होणार? यासंदर्भात राज्यातील विद्यापीठाची समिती स्थापन करण्यात आली असून येत्या दोन- तीन दिवसात ते याबाबत राज्यपालांना अहवाल सादर करतील. त्या अनुषंघाने राज्यपाल विद्यापीठ कुलगुरूंशी संवाद साधुन चर्चा करणार असल्याची माहीती विद्यापीठाच्या सुत्रांकडून मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon university collage exam no desisone state camity