विद्यापीठाने सुरू केली "ऑनलाइन' समुपदेशन सेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 एप्रिल 2020

"कोरोना विषाणू'विषयक भीती, गैरसमज, तसेच त्यातून येणारा तणाव, नकारात्मक विचार, अस्वस्थता यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उद्‌भवू लागल्या आहेत.

जळगाव  : "कोरोना विषाणू'च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थी व नागरिकांसाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. 

मानसशास्त्र व योगा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील व प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. "कोरोना विषाणू'विषयक भीती, गैरसमज, तसेच त्यातून येणारा तणाव, नकारात्मक विचार, अस्वस्थता यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी सकारात्मक विचारांचे रोपण करण्यासाठी ताणतणाव, चिंता, भीती दूर होऊन सकारात्मक मानसिकतेने सामोरे जाणे विद्यार्थ्यांना व नागरिकांना शक्‍य व्हावे म्हणून विद्यापीठ परिक्षेत्रातील मानसशास्त्र तज्ज्ञ व योगशास्राचे तज्ज्ञ यांच्या मदतीने समुपदेशन सेवा दिली जात आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती योगा कोर्स समन्वयक तथा विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The university launched "online" counseling services