Loksabha 2019 : उन्मेष पाटलांच्या उमेदवारीमुळे समीकरणे बदलणार 

Loksabha 2019 : उन्मेष पाटलांच्या उमेदवारीमुळे समीकरणे बदलणार 

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याच्या सुरवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार उन्मेष पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आपल्या कार्यकुशलतेने अल्पावधीतच पक्षसंघटन मजबूत करण्यासह पक्षातील वरिष्ठांची मर्जी संपादन करणाऱ्या उन्मेष पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील असले, तरी उन्मेष पाटलांचा त्यांच्या आमदारकीच्या काळात वाढलेला जनसंपर्क व त्यांनी आपल्या ‘मायक्रो प्लानिंग’ने विशेषतः युवकांचे तयार केलेले संघटन यांमुळे उन्मेष पाटील देवकरांपेक्षा वरचढ ठरतात. भाजपतर्फे खासदारकीसाठी उन्मेष पाटलांना उमेदवारी मिळाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, याच मतदारसंघातील मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. 
 
विधानसभेचा चाळीसगाव मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांचा अपवाद वगळता तालुक्यातील जनतेने भाजप उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. त्यांच्यानंतर उन्मेष पाटील हे भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर पुन्हा पक्षाचे प्राबल्य वाढले आहे. सध्या भाजपमध्ये गटबाजी असल्याचे उघडउघड दिसून येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील काही ठराविकच नावे म्हणजे भाजप असे चित्र होते. आमदार उन्मेष पाटील यांनी मात्र हे चित्र बदलवून कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे केल्याने पक्षाला मोठी ताकद तालुक्यात निर्माण झाली आहे. खासदार ए. टी. पाटील यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाल्यानंतर आमदार उन्मेष पाटील यांचेच नाव घेतले जात होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती, पालिका व बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विश्‍वास त्यांनी अल्पावधीतच संपादन केला आहे. एकीकडे त्यांच्या स्वकर्तृत्वातून पक्षसंघटन मजबूत होत असताना, दुसरीकडे अनेक कारणांमुळे त्यांच्याच पक्षातील विशेषतः काही जुने पदाधिकारी त्यांच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत ए. टी. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पारोळ्यात जो मेळावा घेतला, त्या मेळाव्याला आमदार उन्मेष पाटील यांच्यापासून दुरावलेले अनेक जण गेले होते. अर्थात, आमदार उन्मेष पाटील यांना त्यामुळे काहीच फरक पडत नसल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ठामपणे सांगतात. उच्चविद्याविभूषित असलेले उन्मेष पाटील यांनी आमदार होण्यापूर्वी सुरू केलेले सामाजिक कार्य आजही सुरूच ठेवले आहे. यासाठी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यांची मोलाची साथ लाभली आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळविलेला निधी, वाढविलेले पक्षसंघटन, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली जवळीक यांमुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून जे काही सर्वेक्षण करण्यात आले होते व संघपरिवाराकडूनही जी काही चाचपणी करण्यात आली होती, त्यात आमदार उन्मेष पाटील यांचेच नाव पहिल्या क्रमांकावर होते. स्मिता वाघ यांना पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले असले, तरी त्यांना पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे. खासदारकीसाठी सर्वार्थाने उन्मेष पाटलांपेक्षा दुसरा कुठलाही उमेदवार या मतदारसंघात टिकू शकत नाही, हे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदार स्थानिक विषयांपेक्षा राष्ट्रीय विषयांना अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे मोदी लाटेचा उन्मेष पाटलांना फायदाच होणार आहे. 

देवकारांसमोर आव्हान 
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तसे पक्ष म्हणून भरीव कार्य दिसून येत नाही. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेच चित्र आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी योग्य उमेदवार न दिल्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. नगराध्यक्षपद सध्या भाजपकडे असले, तरी देशमुख गटाचे ३४ पैकी १७ नगरसेवक आहेत. पंचायत समितीतही चौदापैकी सात व जिल्हा परिषदेत सातपैकी चार सदस्य त्यांचेच आहेत. शेतकी संघही ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात आहे. बाजार समितीत भाजपचे सदस्य निवडून आले असले, तरी प्रत्यक्षात कामकाज ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत याच तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या गुलाबराव देवकरांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये उत्साह दिसून येत आहे. भाजपच्या स्मिता वाघ यांच्यापेक्षा उन्मेष पाटील यांची उमेदवारी देवकरांना तुल्यबळ ठरणार आहे. त्यामुळेच देवकारांसमोर जणू आव्हान निर्माण झाले आहे. 

गेल्या वेळी लोकसभेत मिळालेली मते 
गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या चाळीसगाव मतदारसंघातून एक लाख ७८ हजार ८२७ मतदारांनी मतदान केल्याने ५६.७९ टक्के मतदान झाले होते. ज्यात भाजपचे ए. टी. पाटील यांना एक लाख १५ हजार ३३५, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांना ४५ हजार २३८ मते मिळाली होती. म्हणजेच ७० हजारांवर आघाडी ए. टी. पाटील यांनी चाळीसगाव मतदारसंघातून घेतली होती. 

२२ हजार मतदार वाढले 
विधानसभेच्या चाळीसगाव मतदारसंघात २०१४ मध्ये एक लाख ६८ हजार ९७५ पुरुष व एक लाख ४५ हजार ९१३ महिला, असे एकूण तीन लाख १४ हजार ८८८ मतदार होते. सध्या तब्बल २२ हजारांवर मतदार वाढले आहेत. एक लाख ७८ हजार ९६६ पुरुष व एक लाख ५८ हजार ३७७ महिला, असे एकूण तीन लाख ३७ हजार ३४३ मतदारसंख्या असून, मतदारयादीत ३१ मार्चपर्यंत नावे समाविष्ट करण्याची मुदत असल्याने यात आणखीन हजार- दीड हजाराने वाढ होण्याची शक्यता असल्याचे येथील निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com