अवकाळी पाऊस : जिल्ह्यात शंभर कोटींच्या नुकसानीचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

 गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व नुकसान 33 टक्‍क्‍यांच्यावर आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. 

जळगाव : शहरासह जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील 30 हजार 260 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक 16 हजार 20 हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण 294 गावातील 31 हजार 117 शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने हिरावला आहे. सुमारे शंभर कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

 
गहू, केळीसह इतर पिकांना फटका 
रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. सर्वाधिक सात हजार 100 हेक्‍टरवरील मक्‍याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार 777 हेक्‍टरवरील गव्हाचे, तर पाच हजार 870 हेक्‍टरवरील केळीला फटका बसला आहे. 
 
चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान 
या गारपिटीचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्‍याला बसला आहे. यामध्ये तालुक्‍यातील 92 गावांमधील 20 हजार 691 शेतकऱ्यांच्या 3832 हेक्‍टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. 3 हजार 787 हेक्‍टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे 2 हजार 88 हेक्‍टरवरील केळी, 2 हजार 76 हेक्‍टरवरील हरभरा, 2 हजार 72 हेक्‍टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. 

जळगाव तालुक्‍यात 33 गावे बांधीत 
जळगाव तालुक्‍यातील 33 गावांमध्ये 3 हजार 452 शेतकऱ्यांचे 7 हजार 826 हेक्‍टरवर तर अमळनेर तालुक्‍यातील 44 गावांमध्ये 4 हजार 613 शेतकऱ्यांचे 3 हजार 589.91 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी फॉर्म तातडीने भरा 
सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे काढणी पश्‍चात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीबाबतचा विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरून 48 तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी ro.mumbai@aicofindia.com, chandralantg@aicofindia.com वर पाठवावेत. अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे. 

 

तालुकानिहाय नुकसान असे 

तालुकाबाधीत गावे--बाधित शेतकरी--एकूण नुकसान (हेक्‍टर) 
जळगाव--33--3452--7826.00 
यावल--5--87--70.65 
रावेर--2--4-52.69 
बोदवड--11--84--80.00 
मुक्ताईनगर--70--540--517.00 
जामनेर--14--436--360.00 
अमळनेर--44--4613--3589.91 
धरणगाव--23--1210--1795.00 
चोपडा--92--20691--16019.70 
एकूण--294--31117--30260.95 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon untimely rain issue 100 carrore Loss farmer