भाजीपाल्याचे भाव कडाडले...वाहतूक विस्कळित झाल्याने आवक दहा टक्‍क्‍यांवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

दररोजच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजारपेठेत केवळ मोजकाच भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्याने आज सकाळपासून भाजीपाला चढ्या भावाने विकला जात होता. 

जळगाव  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यभरात रविवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे आज भाजीपाल्याची आवक केवळ दहा टक्‍के इतकीच झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपालाच नसल्याने भाव गगनाला भिडले होते. 

"जनता कर्फ्यू'मुळे रविवारी शेतकरी शेतात गेला नाही, तसेच खासगी वाहने देखील बंद असल्याने जिल्हाभरातून येणारा भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आला नाही. दररोजच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजारपेठेत केवळ मोजकाच भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्याने आज सकाळपासून भाजीपाला चढ्या भावाने विकला जात होता. 

आडत्यांकडून संधीचा फायदा 
रोजच्या तुलनेत आज भाजीपाल्याची आवक केवळ 10 टक्‍क्‍यांवर होती. त्यामुळे मोजकाच भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आला होता. या संधीचा फायदा घेत आडत्यांनी विक्रेत्यांना भाजीपाला चढ्याभावाने विक्री केला. त्यामुळे विक्रेत्यांना नाइलाजास्तव भाजीपाला अधिक भावाने विकावा लागला. 

गृहिणींचे "बजेट' कोलमडणार 
शनिवारपर्यंत 10 ते 15 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे भाजीबाजारात दिसून आले. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 

...असे आहेत भाजीपाल्याचे दर (किलोमध्ये) 
भाजीपाला शनिवारचे दर आजचे दर 
कोथिंबीर 10 रुपये 70 रुपये 
मिरची 20 रुपये 80 रुपये 
फ्लॉवर 20 रुपये 50 रुपये 
टोमॅटो 10 रुपये 40 रुपये 
मेथी 5 रुपये जुडी 20 रुपये जुडी 
वांगे 15 रुपये 30 रुपये 
वाल 20 रुपये 80 रुपये 
गवार 20 रुपये 70 रुपये 
भेंडी 25 रुपये 80 रुपये 

"जनता कर्फ्यू'मुळे रविवारी शेतकऱ्याने शेतातील भाजीपाला काढला नाही. तसेच खासगी वाहतूक व्यवस्था देखील बंद असल्याने शेतकरी बाजारपेठेत भाजीपाला घेऊन आला नाही. दररोजच्या तुलनेत केवळ मोजकाच भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आला आहे. 
- विशाल पाटील, भाजीपाला विक्रेता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Vegetable prices plummeted