विधानसभा निवडणूक : भाजपतर्फे 164 इच्छुक उमेदवारांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत. 

जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत. 
भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षातर्फे आज औद्योगिक वसाहतीतील बालाणी रिसॉर्ट येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राज्याचे ऊर्जामंत्री व पक्षाचे जिल्हा प्रभारी मदन येरावार, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांना शक्तिप्रदर्शन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांना सोबत न घेता फक्त उमेदवार मुलाखतीस हजर होते. जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून तब्बल 164 जणांनी उमेदवारीची तयारी दाखविली आहे. 
विधानसभानिहाय इच्छुक उमेदवारांची संख्या अशी : जळगाव शहर - 20, जळगाव ग्रामीण -14, रावेर -14, चोपडा-12, अमळनेर- 22, भुसावळ- 6, एरंडोल-10, मुक्ताईनगर-4, पाचोरा-24, चाळीसगाव- 35, जामनेर- 1 

चाळीसगावमधून खासदारपत्नी इच्छुक 
चाळीसगाव मतदार संघातून 35 जण इच्छुक आहेत. यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या सुद्धा इच्छुक आहेत. तर काही इच्छुकांनी समजलेली नावे अशी : डॉ. विनोद कोतकर, प्रफुल्ल साळुंखे, चित्रसेन पाटील, डॉ. सजीव पाटील, पोपट(तात्या) भोळे, मंगेश चव्हाण, राजेंद्र अण्णा, किशोर पाटील (धोमणेकर), अविनाश सूर्यवंशी (वाघळी), किशोर पाटील (करजगाव), संभाजीराजे पाटील (सायगाव), समाधान पाटील, धर्मा वाघ (दहिवद), सतीश दराडे, उद्धवराव महाजन, डॉ. उत्तमराव महाजन, संजय भास्कर पाटील. 

मुक्ताईनगरात चार जण 
मुक्ताईनगर मतदार संघात यावेळी प्रथमच आठ जणांनी उमेदवारीची तयारी दाखविली आहे. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, विद्यमान उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह चार जण इच्छुक आहेत. ऍड. रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांचा अर्ज नसल्याचे सांगण्यात आले. 

जामनेरात फक्त महाजन 
जामनेर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे जलसपंदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. याशिवाय, अमळनेर मतदारसंघातून आमदार स्मिता वाघ यांच्यासह तब्बल 22 जण इच्छुक आहेत. जळगावमधून आमदार सुरेश भोळे यांच्यासह 20 जण इच्छुक आहेत. 

कोअर कमिटीची बैठक 
इच्छुकांच्या मुलाखती घेण्याअगोदर सकाळी दहाला पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मदन येरावार, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vidhansabha election BJP candidate interviwe