esakal | आमदार भोळे निश्‍चिंत, कॉंग्रेससमोर पहाड 
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार भोळे निश्‍चिंत, कॉंग्रेससमोर पहाड 

आमदार भोळे निश्‍चिंत, कॉंग्रेससमोर पहाड 

sakal_logo
By
कैलास शिंदे

भाजपचा लोकसभेचा खासदार, मतदारसंघात भाजपचा आमदार, महापालिकेवर सत्ता आणि राज्यातील पक्षाचे आणि सरकारचे "संकटमोचक' असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भक्कम नेतृत्व असे "सबकुछ भाजप' असलेल्या जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी मिळणार हे निश्‍चित असले, तरी पक्षातील इच्छुकांच्या संख्येमुळे त्यांच्या उमेदवारीवर किंचितसे सावट आहे. दुसरीकडे युतीतील मित्रपक्ष शिवसेना जैन यांच्या उमेदवारीचा दावा करीत असतानाच घरकुल घोटाळ्याचा निकाल आला अन्‌ त्यांची म्हैस पाण्यात गेली. "आघाडी'त ही जागा कॉंग्रेसकडे असल्याने डॉ. राधेश्‍याम चौधरींच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र जातीय गणिताच्या जुळवणीत कॉंग्रेसकडून आणखी एखादा नवीन उमेदवार देण्याची तयारीही होऊ शकते. तरीही संघटनात्मक पातळीवर क्षीण झालेल्या कॉंग्रेसला यश मिळविण्यासाठी मोठा पहाड चढावा लागणार आहे. 


जळगाव शहर मतदारसंघ म्हटला, म्हणजे सुरेशदादा जैन हेच समीकरण गेल्या पंचवीस वर्षांपासून झाले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे ते आता बदलले आहे. भाजपचे सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे हे जैन यांचा पराभव करून "जायंट किलर' ठरले होते. अर्थात जैन यांच्या पराभवाला अनेक कंगोरे होते. निवडणुकीवेळी ते कारागृहात असल्यामुळे त्यांचा लोकसंपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यांना प्रचाराची संधी मिळाली असती, तर चित्र बदलले असते असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. परंतु शेवटी "जो जीता वही सिकंदर' असे म्हटले जाते. त्यामुळे भोळे यांच्या विजयानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी जळगावचा आमदार बदलला अन्‌ जळगावचे राजकारणानेही वळण घेतले. 

पालिकेवरील साम्राज्यालाही हादरा 
सन 1985 पासून सुरेशदादा जैन यांचे जळगाव पालिकेवर वर्चस्व होते. सन 2019 पर्यंत त्याला कोणीही हादरा देवू शकले नाही. तब्बल पस्तीस वर्षे वर्चस्व असलेल्या महापालिकेवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले आहे. भाजपचे "संकटमोचक' नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे महापालिकेवर तब्बल 57 नगरसेवक आले, तर जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे केवळ पंधराच उमेदवार निवडून आले. जैन यांचे महापालिकेवरील वर्चस्वही संपले आहे. त्यामुळे सध्या जळगाव शहरावर "भाजप'चे साम्राज्य आहे. 

भाजपचा उमेदवार निश्‍चित, पण... 
जळगाव मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. आमदार भोळे यांनी मतदारसंघाची बांधणी चांगली केली आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांच्या पत्नी सीमा भोळे जळगावच्या महापौर आहेत. हीच बाब हेरून जळगावच्या समस्यांबाबत विरोधक त्यांच्यावर रोख ठेवत आहेत. मात्र, भोळे यांनी आपण जळगावच्या विकासासाठी निधी आणल्याचा दावा करून विरोधकांना समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. विकासकामे पूर्ण झाल्यास जळगाव शहराचा कायापालट दिसेल, असा त्यांचा दावा आहे. तरीही त्यांच्या उमेदवारीबाबत किंचितशी साशंकता व्यक्त होत आहे. पक्षातून माजी महापौर ललित कोल्हे हे सुद्धा इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. 

सुरेशदादांचा दावा समाप्त 
जळगाव मतदारसंघात शिवसेनेचे नेते व माजी उमेदवार सुरेशदादा जैन यावेळी पुन्हा उमेदवार असणार काय, याची चर्चा रोज रंगत होती. तथापि, स्वत: जैन यांनी मात्र निवडणूक लढविण्याबाबतची कोणतीही जाहीर घोषणा केलेली नव्हती आणि आता तर "घरकुल' प्रकरणाच्या निकालानंतर त्यांचा उमेदवारीवरील दावाच संपुष्टात आला आहे. तरीही स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास जळगावात शिवसेनेतर्फे माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा यांच्या नावाचीही चर्चा आहे. लढ्ढा यांच्या नावाबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात असला, तरी जैन यांच्या विजयाप्रमाणेच त्यामागे एका वेगळ्या राजकीय गणिताची चर्चा होत आहे. त्यामुळे "युती' होण्याकडे आणि जागावाटपावरही शिवसेनेची उमेदवारी अवलंबून आहे. 

कॉंग्रेससमोर मोठे आव्हान 
आघाडीत जळगाव शहरची जागा कॉंग्रेसकडे आहे. जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी हे पक्षाचे इच्छुक आणि प्रबळ दावेदार उमेदवार आहेत. मात्र, पक्ष शहरातील जातीय गणितांची जुळवाजुळव करताना एखादा नवीन उमेदवारही ऐनवेळी देवू शकतो. शहरात कॉंग्रेसची ताकद अत्यंत क्षीण आहे. शहरात अनेक भागात कॉंग्रेसच्या शाखाही नाहीत. अशा स्थितीत भाजपच्या संघटनात्मक बांधणीसमोर टिकण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासमोर जळगाव शहरात निवडणुकीत यश मिळविण्याचे पहाडाएवढे आव्हान असणार आहे. 
 

विधानसभा 2009 मते 
- सुरेशदादा जैन (शिवसेना) ः 64,706 
- मनोज चौधरी (अपक्ष) ः 33,301 
- सलीम पटेल (कॉंग्रेस) ः 17,612 

विधानसभा 2014 निकाल 
- सुरेश भोळे (भाजप) ः 88,363 
- सुरेशदादा जैन (शिवसेना) 46,049 

loading image
go to top