वाघनगरातील "सुपर स्प्रेडर'मुळे 22 बाधित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

दोन दिवसांपूर्वी वाघनगरातील मृत बाधित रुग्णाच्या संपर्कातील 22 जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जळगाव  : गुरुवारचा दिवस शहरासाठी "कोरोना' संसर्गाचा उद्रेक करणारा ठरला. एकाच दिवसात 28 रुग्ण बाधित निघाले.

त्यांपैकी दोन दिवसांपूर्वी वाघनगरातील मृत बाधित रुग्णाच्या कुटुंबातील नऊ जणांचा समावेश असून, दुसऱ्या कुटुंबातील चार जणांसह अन्य बाधितही याच व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. या मृताच्या अंत्ययात्रेत 40-50 जणांचा समूह एकवटल्याने त्यांनाही संसर्ग झाला असून, ही स्थिती निर्माण होऊनही नागरिक बेफिकीर आणि जिल्हा व महापालिका प्रशासन ढिम्म आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांत "कोरोना' संसर्गावर कठोर उपाययोजनांद्वारे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत असताना, जळगाव जिल्ह्याची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात 34 रुग्ण बाधित आढळून आले असून, त्यांपैकी एकट्या जळगाव शहरातील 28 बाधितांचा समावेश आहे. 28 बाधितांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाघनगरातील मृत बाधित रुग्णाच्या संपर्कातील 22 जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अंत्ययात्रेने वाढला संसर्ग 
दोन दिवसांपूर्वीच वाघनगरातील एक टायर पंक्‍चरचा व्यवसाय असलेला व्यक्ती "कोरोना'बाधित आढळून आला होता. अर्थात, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. "लॉकडाउन' सुरू असल्याने संसर्ग रोखण्याचा उपाय म्हणून अंत्ययात्रेत केवळ 20 जणांनाच उपस्थित राहणे बंधनकारक असताना, या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत 40-50 जणांचा समूह एकवटल्याचे वृत्त आहे. त्यातूनच ही मृत व्यक्ती अनेकांसाठी "सुपर स्प्रेडर' ठरली असून, त्याच्या संपर्कातील 22 जण बाधित आढळून आले आहेत. 

दोन कुटुंबांतील 13 जण 
या व्यक्तीच्या कुटुंबातील व जवळचे नातलग, असे नऊ जण आणि संपर्कातील दुसऱ्या कुटुंबातील चार, असे तेरा जणांचे अहवाल आज "पॉझिटिव्ह' आले; तर याच परिसरात राजीव गांधीनगर व पुढे श्‍यामनगर परिसरातील नऊ जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहेत. आता जिल्हा प्रशासन व महापालिका आरोग्य यंत्रणांचे काम यामुळे वाढले असून, या 22 जणांच्या संपर्क साखळीतील संशयितांचा शोध सुरू झाला आहे. 

आणखी दोन परिसर "सील' 
वाघनगरातील रुग्ण बाधित आढळल्यानंतर हा भाग मंगळवारीच "कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करून "सील' करण्यात आला होता. आता या परिसरातील राजीव गांधीनगर व श्‍यामनगर "सील' करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती, तसेच हा परिसर निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. 

शाहूनगर, सम्राट कॉलनीतील बाधित 
आज आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये शाहूनगरातील दोन, सम्राट कॉलनी व ओंकारनगरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. हे चारही जण आधीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon waghnager super spyredar by corona patients